अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून दिल्या जाणार्या परवानग्या, मंजुरीला विलंब होत असल्याने यात सुसूत्रता आणून कामकाजात गतिमानता आणण्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. ऑनलाईन फाईल सबमिट करण्यापूर्वी त्या फायलींची ऑफलाईन पडताळणी केली जाईल. सर्व त्रुटी दूर करूनच ऑनलाईन फाईल सबमिट केली जाईल. या माध्यामातून ऑनलाईन फायली दहा दिवसांत निकाली काढता येतील व नागरिकांना वेळेत व जलदगतीने परवानग्या मिळतील, असे नियोजन करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
नगररचना विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आयुक्त डांगे यांनी आर्किटेक्ट इंजिनिअर असोसिएशन व नगररचना विभागाच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक घेतली. यात फायलींची पडताळणी, छाननी, मंजुरी यासाठी लागणार्या वेळेची माहिती घेण्यात आली. ऑनलाईन फाईल जमा होतानाच ती त्रुटीविरहीत असल्यास परवानगीला विलंब होणार नाही. त्यामुळे फायलींची ऑफलाईन पडताळणी आधी करून घ्यावी. त्यासाठी एकेका विभागासाठी आठवड्यातील एक दिवस/वार निश्चित करावा. त्यादिवशी संबंधित विभागाच्या क्लर्क, सहाय्यक नगररचनाकार, नगररचनाकार व सहाय्यक संचालक नगररचना हे एकत्र बसून छाननी करून त्रुटी काढतील. त्याची पूर्तता करूनच ऑनलाईन फाईल सबमिट होईल, असे नियोजन करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
तसेच 300 स्क्वेअर मीटरच्या आतील फायलींची पडताळणी, छाननी आर्किटेक्ट स्वतःच करून देतील. त्यानुसार महानगरपालिका नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी किंवा बांधकाम पूर्तता प्रमाणपत्र देईल. त्यासाठी संबंधित आर्किटेक्टला महानगरपालिकेत बंधपत्र, हमीपत्र द्यावे लागेल.