अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नागापूर एमआयडीसी परिसरातील प्रगत कृषी यंत्रोद्योग कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली 7 लाख 60 हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना 4 ते 5 ऑक्टोबरदरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 7 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कंपनीचे मालक सतीश सावळेराम डाके (वय 64, रा. गुरूकृपा कॉलनी, सावेडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कंपनी बंद केल्यानंतर ते 5 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरी झाली. अज्ञात चोरट्याने कंपनीच्या कार्यालयाच्या प्रवेशव्दाराचे कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.
त्यानंतर कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली 7 लाख 60 हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली. चोरीची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी 7 ऑक्टोबर रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजू सुद्रीक तपास करीत आहेत. पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.




