Tuesday, September 8, 2026
HomeनगरShirdi : साईभक्तांच्या विश्वासाचा ठेवा जपणारा शिर्डीचा संरक्षण विभाग

Shirdi : साईभक्तांच्या विश्वासाचा ठेवा जपणारा शिर्डीचा संरक्षण विभाग

85 लाखांहून अधिकच्या हरवलेल्या वस्तू परत करत नवा आदर्श

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक श्रद्धा आणि भक्तीभावाने शिर्डीत येत असतात. या भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुखद दर्शन मिळावे आणि त्यांच्या मालमत्तेची संपूर्ण सुरक्षितता राखली जावी, यासाठी साईबाबा संस्थानचा संरक्षण विभाग अहोरात्र कार्यरत आहे. हरवलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या प्रामाणिकपणे मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यातून या विभागाने सेवाभाव आणि पारदर्शकतेचा एक अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे.
आतापर्यंत संरक्षण विभागाने सुमारे 85 लाखांहून अधिक किमतीची रोकड, दागिने, महिलांच्या पर्स, मोबाईल, घड्याळे व इतर मौल्यवान वस्तू संबंधित साईभक्तांना सुरक्षितपणे परत केल्या आहेत. या उल्लेखनीय कार्याची विविध प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी दखल घेऊन प्रशंसा केली आहे.

- Advertisement -

सध्या शिर्डीत गुरुपौर्णिमा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून आजपासून महोत्सवाला प्रारंभ होत असल्याने मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अशाच गर्दीच्या वेळी प्रामाणिकपणाचा एक अत्यंत सुंदर प्रसंग घडला. साईबाबा मंदिरातील पारायण कक्षात सेवा बजावत असताना अनुपमा निरंजन (रा. बेंगळुरू) यांना एक पर्स सापडली. या पर्समध्ये 15,410 रुपयांची रोकड आणि ओळखपत्र होते. कोणताही मोह न बाळगता त्यांनी ती पर्स तात्काळ साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.

संरक्षण विभागाने कागदपत्रांच्या आधारे चौकशी केली असता ती पर्स जी. व्ही. राजू (रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांची असल्याचे निष्पन्न झाले. मंदिर परिसरात तात्काळ उद्घोषणा करून संबंधित भक्ताला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. काही वेळातच श्री. राजू संरक्षण कार्यालयात पोहोचले. आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर त्यांची पर्स आणि 15,410 रुपयांची रोकड त्यांना अत्यंत सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आली. एका साईभक्ताच्या प्रामाणिकपणामुळे दुसर्‍या भक्ताला त्याची हरवलेली पुंजी परत मिळाल्याने श्रद्धा, सचोटी आणि मानवतेचा एक अनोखा संगम साईबाबांच्या शिकवणीचा जिवंत अनुभव देणारा ठरला.

अनुपमा निरंजन यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणा व तत्परतेची दखल घेत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. संरक्षण विभाग प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसर, भक्तनिवास आणि संस्थानच्या विविध परिसरामध्ये सापडलेल्या हरवलेल्या वस्तू त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य अतिशय निष्ठेने करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचा प्रत्येक घटक साईभक्तांना आनंददायी दर्शनाचा अनुभव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

साईबाबा संस्थानमध्ये सेवेदरम्यान कर्मचार्‍यांना सापडलेल्या हरवलेल्या वस्तूंच्या प्रामाणिकपणाचे चीज व्हावे आणि त्यांना शाबासकीची थाप मिळावी, या उद्देशाने सुरक्षा अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी गेल्या एक-दोन वर्षांपासून अशा प्रामाणिक कर्मचार्‍यांचा सन्मान करण्याचा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पेठ रोडवर एमडी विक्रीचा प्रयत्न फसला; दोघांना...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati पेठ रोडवरील (Peth Road) म्हसरूळ परिसरात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अमली पदार्थविरोधी पथकाने (Anti-Narcotics...