कोल्हापूर | Kolhpur
कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) अत्यंत प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीत सुरुवातीपासूनच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (MLA Satej Patil) यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ने १४ जागांवर आघाडी घेत महायुतीप्रणीत ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ला मोठा धक्का दिला आहे.
मोठे चेहरे पिछाडीवर; महायुतीच्या गोटात चिंतेचे सावट
तिसऱ्या फेरीअखेर आलेल्या कलांनुसार, गोकुळचे माजी अध्यक्ष आणि महायुतीचे (Mahayuti) प्रमुख चेहरे अरुण डोंगळे हे मोठ्या मताधिक्याने पिछाडीवर पडले आहेत. याशिवाय, गोकुळचे माजी अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ (ओबीसी गट) हेदेखील पिछाडीवर असून, त्यांच्याविरोधात समविचारी आघाडीचे शशिकांत खोत यांनी आघाडी घेतली आहे. महायुतीचे अमर पाटील, विश्वास पाटील, अशोक चरटी आणि प्रताप पाटील कावणेकर हे प्रमुख उमेदवारही पिछाडीवर आहेत.
२०० हून अधिक अवैध मते ठरणार ‘किंगमेकर’
गोकुळ निवडणुकीचा इतिहास पाहता विजय आणि पराभवाचे अंतर हे साधारण ४० ते ५० मतांचे असते. १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात ५,४१८ पैकी विक्रमी ५,४१६ (९९.९६%) ठरावधारकांनी मतदान केले होते. मात्र, या अत्यंत चुरशीच्या लढतीत २०० हून अधिक मते तांत्रिक कारणांमुळे (उदा. मतपत्रिका फाटणे, चुकीचे शिक्के) अवैध ठरली आहेत. अवघ्या काही मतांच्या फरकाने विजयाचे गणित ठरणार असल्याने ही अवैध ठरलेली मतेच या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरणार आहेत.
आघाडी-पिछाडीचे तिसऱ्या फेरीअखेर चित्र
गोकुळ दूध संघाच्या संचालक पदांच्या एकूण २५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये आता आमदार सतेज पाटील गटाच्या समविचारी आघाडीचे १४ उमेदवार आघाडीवर आहेत. यात शशिकांत पाटील-चुयेकर, अभिजित तायशेटे, विद्याधर गुरुबे, राहुल देसाई, अंजना रेडेकर, माजी आमदार राजू आवळे यांचा समावेश आहे. तर महायुतीचे ११ उमेदवार आघाडीवर असून, यामध्ये राखीव गटातून शोमिका महाडिक आघाडीवर आहेत.
सुरक्षा व्यवस्था कडक; मिरवणुकांवर बंदी
रमणमळा येथील सरकारी गोदामात सुरू असलेल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने रमणमळा परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून, निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे.




