नागपूर | Nagpur
बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सैफ अली खानवर झालेला जीवघेणा हल्ला या घटनांवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या घटनांवरून विरोधकांनी गृहविभाग आणि मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून, सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलाय. मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलाय.
काय म्हणाले नाना पटोले?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून गुन्हेगारांना पोलिसांची भिती राहिली नाही. आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही अशी मानसिकता गुन्हेगारांची झाली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेला फक्त गृहमंत्रीच जबाबदार नाहीत, मंत्रिमंडळातच ६५ टक्के मंत्री डागी असतील तर यापेक्षा वेगळे चित्र काय दिसणार आहे, पण ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला जाती धर्माच्या दृष्टीकोणातून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही, या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू, या घटनाही जाती धर्माशी जोडून पाहणे चुकीचे आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
तसेच मराठा-ओबीसी वाद भाजपा युती सरकारनेच निर्माण केला आहे. त्यातून जनतेचे मुळ प्रश्न बाजूलाच पडले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झालाय, युवकांना बरोजगारीचा सामना करावा लागतोय, महागाई गगनाला भिडलीय, हे प्रश्न महत्वाचे आहेत. जाती धर्माच्या वादात न पडता सरकारविरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा