नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंधश्रद्धेचा बाजार मांडून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या भोंदूबाबांच्या साखळीवर अन्न व औषध प्रशासनाने अखेर कारवाई केली आहे. संगमनेरजवळील वडगावपान येथील बहुचर्चित भोंदू राजेंद्र गडगेबाबा याच्या दरबारात बेकायदेशीर व बोगस औषधांचा पुरवठा करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) आडगाव/जायगाव येथील मे. शिवनाथ आयुर्वेदिक प्रॉडक्ट कंपनीचा (‘Shivnath Ayurved Company) औषध निर्मितीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (License Suspend) कायमस्वरूपी रद्द केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत एफडीएने ही कारवाई केली आहे.
संगमनेर (Sangmner) येथील भोंदू राजेंद्र गडगेबाबा याच्यावर अंनिसच्या पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित डॉ. मोहन पुरी (संचालक, शिवनाथ आयुर्वेद) हा सहसंशयित आहे. गडगेबाबाच्या दरबारात येणाऱ्या भाविकांना डॉक्टर पुरी याच्या कंपनीत तयार झालेली संशयास्पद औषधे दिली जात असल्याचे तपासात उघडकीस आले होते. या बाबीची नोंद घेत ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी २५ एप्रिल २०२६ रोजी एफडीएकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने प्रत्यक्ष कारखान्यावर छापा टाकून तपासणी केली हाेती.
तपासणीनंतर २ जून २०२६ रोजी डॉ. मोहन पुरी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर २५ जून २०२६ रोजी मुंबई (Mumbai) येथील तंत्र अधिकारी व अनुज्ञाप्ती अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष सुनावणी झाली. या सुनावणीत डॉ. पुरी यांचे स्पष्टीकरण अमान्य करत, नियमांचा गंभीर भंग झाल्याचे निष्पन्न झाले.सर्व कायदेशीर बाबी आणि नियमांचे उल्लंघन विचारात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने ३० जून २०२६ रोजी अंतिम आदेश पारित करत शिवनाथ आयुर्वेदिक प्रॉडक्ट कंपनीचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.
भोंदूबाबांच्या हस्तकाचे धागेदाेरे?
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार डॉ. मोहन पुरी हा केवळ औषध निर्माता नसून भोंदू राजेंद्र गडगेबाबाचा अत्यंत निकटवर्तीय व हस्तक असल्याचे समोर आले आहे. नामांकित नसलेल्या व बोगस (Fake) औषधांचा वापर करून रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या विविध भोंदूबाबांना औषध पुरवठा करण्याचे काम या नेटवर्कद्वारे केले जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
तपासणीत उघड झालेल्या त्रुटी
१. औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या शासकीय निकषांची पायमल्ली.
२. उत्पादन प्रक्रियेत अत्यंत गंभीर त्रुटी व अस्वच्छता.
३. औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील अनेक नियमांचे थेट उल्लंघन.




