
मुंबई । Mumbai
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात “आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं,” असे विधान केले अन् राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या. पंकजा मुंडे यांच्या या भावनिक उद्गारानंतर विरोधकांनी तातडीने राजकीय डाव टाकत मोठी खेळी खेळली आहे. काँग्रेस पक्षाने पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे खुले आमंत्रण दिले असून, थेट महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा प्रस्तावच त्यांच्यासमोर ठेवला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका करताना सांगितले की, “लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतर भाजपमध्ये बहुजन आणि ओबीसी नेतृत्वाला पद्धतशीरपणे दुय्यम स्थानावर ढकलले जात आहे. पंकजा ताईंसारख्या सक्षम नेत्याला पक्षात योग्य तो मानसन्मान आणि न्याय मिळत नसल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. जर त्यांना स्वतःवर अन्याय होत असल्याचे वाटत असेल, तर त्यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये यावे. काँग्रेस पक्ष त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि त्यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्यासाठी हायकमांडशी सकारात्मक चर्चा केली जाईल.” यासोबतच वडेट्टीवार यांनी ओबीसी मुद्द्यांवरून सरकारला घेरले. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये लवकरच ‘मंडल यात्रा’ काढण्यात येणार असून, याद्वारे ओबीसींची जातनिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, महाज्योती संस्थेला वाढीव निधी आणि अनुशेष भरतीची मागणी लावून धरली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना पंकजा मुंडे यांनी खराब रस्त्यांचा प्रवास आणि राजकीय थकवा यावरून “आता रिटायर व्हावंसं वाटतं” असे विधान केले होते. मात्र, पुढे बोलताना त्यांनी उपस्थितांचा प्रचंड उत्साह पाहून, “लोकांचे प्रेम पाहून मला काम करण्याची नवी ऊर्जा मिळते, त्यामुळे विकासाची घोडदौड सुरूच राहील,” असे स्पष्ट करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. पंकजा मुंडे यांनी अद्याप या ऑफरवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरीही त्या या प्रस्तावावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.




