मुंबई । Mumbai
राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या मतदानाला केवळ एक दिवस शिल्लक असताना २० नगरपालिका आणि काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय आश्चर्यकारक आणि अनाकलनीय असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय न्यायालयाच्या निकालामुळे घेतला गेला असेल, तर तो निकाल २२ नोव्हेंबर रोजी आला होता. मग ३० नोव्हेंबरपर्यंत, म्हणजेच आठ दिवस निवडणूक आयोग काय करत होता, असा संतप्त सवाल सपकाळ यांनी केला आहे. निवडणूक आयोग स्वतःचे नियमही पाळू शकत नाही आणि त्यांचा कारभार पूर्णपणे गोंधळाचा सुरू आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास १० वर्षांनंतर होत आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असतात, परंतु त्यातही मोठा गोंधळ निर्माण करण्यात आला. सुरुवातीला अर्ज भरण्याची प्रक्रिया क्लिष्ट करण्यात आली. तसेच, मतदार याद्यांमध्येही प्रचंड घोळ आढळला; दुबार किंवा तिबार नावे यादीत दिसली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या निर्देशामुळे अनेक नगरपंचायतींचे भवितव्य धोक्यात आले. आता तर २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका स्थगित करून त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
पुढे ढकललेल्या निवडणुकांचे मतदान २० तारखेला होणार आहे. या निवडणुकीच्या निकालावर ३ तारखेच्या निकालाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ३ तारखेचा निकालही २० तारखेच्या मतदानानंतरच जाहीर करावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली. निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे आयोगाचे कर्तव्य असताना, मागील काही वर्षांतील कारभारावरून आयोगाला निवडणुकाही व्यवस्थित घेता येत नाहीत, हे खेदजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुसऱ्या एका मुद्द्यावर बोलताना, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल करणे हा राजकीय सूडबुद्धीतून केलेला प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत आहेत, असे सपकाळ म्हणाले. नॅशनल हेरॉल्डचे प्रकरण निराधार आणि कपोलकल्पित असून, अनेक चौकशा होऊनही त्यात काहीही ठोस आढळले नाही. तरीही केवळ गांधी कुटुंबाला बदनाम करण्यासाठी आणि त्यांना नाहक त्रास देण्यासाठी मोदी-शाह सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचे राजकारण करत आहेत.
गांधी कुटुंबाचे देशासाठी मोठे योगदान आहे आणि त्याग-बलिदानाची मोठी परंपरा आहे. मोदी-शाह यांच्या दडपशाहीविरुद्ध लोकशाही आणि संविधान वाचवण्याचे काम राहुल गांधी करत असल्यानेच त्यांच्यावर अशा कारवाया केल्या जात आहेत, असे सपकाळ यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस अशा कारवायांना भीक घालत नाही आणि मोदी-शाह यांच्या सूडाच्या राजकारणाचा आम्ही धिक्कार करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गुन्हे दाखल करणारे मोदी-शाह यांचे सरकार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे का दाखल करत नाही, असा थेट सवालही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी उपस्थित केला.





