मुंबई | Mumbai
बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेल्या एका घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी रोखल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या घटनेवर टीका करताना महाराष्ट्र काँग्रेसच्या त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘गुंगी गुडिया’ असा केला आहे. यावरून आता राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे एरवी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुनेत्रा पवारांवर टीका करताना वापलेल्या भाषेवरून काँग्रेसवरच टीका केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काय पोस्ट केली?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत कडक शब्दांत टीका केली आहे. “धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा आहेत का?” असा थेट सवाल काँग्रेसने आपल्या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे. या वादात काँग्रेसने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘गुंगी गुडीया’ असा करत काँग्रेसने जोरदार टीका केली. “सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडीया बनून राहणार?” असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. काँग्रेसच्या टीकेनंतर अंजलि दमानिया मात्र चांगल्याच संतापल्या आहेत.
अंजली दमानियांनी काय म्हंटले?
काँग्रेसच्या या टीकेवरुन अंजली दमानिया यांनी काँग्रेसने वापरलेल्या शब्दांवर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “गुंगी गुडिया? ही कोणती भाषा आहे? एखाद्या राष्ट्रीय पक्षाला अशी भाषा वापरणे शोभते का? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना तरी ही भाषा योग्य वाटते का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांविरुद्ध नेहमीच टोकाचा लढा दिला आहे, पण सुनेत्रा पवार यांच्यासाठी वापरण्यात आलेले हे शब्द अतिशय चुकीचे आणि अपमानजनक आहेत. मी या भाषेचा तीव्र शब्दांत निषेध करते.” असे म्हणत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.




