Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याखरगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मजबूत होईल - पटोले

खरगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मजबूत होईल – पटोले

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

काँग्रेस पक्षाच्या ( Congress Party )राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांचा विजय हा लोकशाही पद्धतीने झाला असून देशात काँग्रेस हाच एक पक्ष आहे ज्या पक्षात कार्यकर्त्यांमधून अध्यक्ष निवडला जातो. मल्लिकार्जून खरगे यांचा दांगडा अनुभव आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होईल आणि केंद्रातील हुकूमशाही सरकारचा पराभव करेल, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole)यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे निवडून आले आहेत. या निवडीबद्दल पटोले यांनी खरगे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माला समान संधी देणारा पक्ष आहे. काँग्रेसमध्ये अध्यक्ष कार्यकर्ते निवडतात, इतर पक्षांसारखे अध्यक्ष लादला जात नाही. काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी मल्लिकार्जुन खरगे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी केंद्र सरकारला जाब विचारण्याचे काम केले. खरगे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली, असेही पटोले म्हणाले.

सोनिया गांधी यांनी कठीण परिस्थितीमध्ये कॉंग्रेसचे नेतृत्व करून पक्षाला नवसंजीवनी दिली. मल्लिकार्जुन खरगे आता देशाचे नेतृत्व करणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात नवे चैतन्य निर्माण होईल आणि जात्यांध, धर्मांध, हुकुमशाहीवृत्तीच्या सरकारचा परभव करतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

खरगे यांच्या नेतृत्वाखाली धर्मांध शक्तींचा पराभव होईल : बाळासाहेब थोरात

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल आणि धर्मांध हुकुमशाही शक्तींचा पराभव होईल, असा विश्वास काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

खरगे यांना गेल्या ५० वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असून या कारकीर्दीत त्यांनी पक्ष संघटना आणि सरकारमधील विविध पदांवर काम पाहिले आहे. पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. आपल्याला मिळालेल्या पदाचा त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापर केला. ते महाराष्ट्राचे प्रभारी असताना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. यावेळी त्यांच्यामधील नेतृत्वगुण आणि संघटनकौशल्य जाणून घेता आले. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या