Friday, July 3, 2026
HomeUncategorizedकरोना निदान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

करोना निदान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

माहिती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आकाराला येत आहे; माहितीने जागतिक अर्थव्यवस्थेत ‘तेला’ची जागा घेतली आहे. प्रत्येक वस्तू, उपकरण हे ‘स्मार्ट’ असणं आज चैन नसून गरज बनत चालली आहे. यंत्रमानव आणि मानव यांच्यातली दरी आगामी शतकात कमी होत जाणार आहे. ‘ऑटोमेशन’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आज सगळ्यात वेगाने वाढणारी क्षेत्रं बनली आहेत.

डॉ दीपक शिकारपूर
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)

नवं युग आता उंबरठयावर येऊन ठेपलं आहे. आजचं युग पूर्णपणे डिजिटल झालंय. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, बिग डेटा ऍनॅलिसिस, रोबोटिक्स या आणि यासारख्या घटकांमुळे संबंधित संगणकीय प्रणाली आणि यंत्रणा अधिकाधिक ऑटोनॉमस म्हणजे स्वतंत्रपणे निर्णय घेणार्‍या आणि स्वयंभू बनत आहेत, यात शंकाच नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकशास्त्रातली एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत्रशिक्षण, त्यांचं बुद्धिमान आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो.

या शाखेतलं संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे; उदाहरणादाखल नियोजन, संयोजन, निदानविषयक प्रश्नांची उत्तरं शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज आणि चेहरा ओळखण्याची क्षमता इत्यादी. कृत्रिम बुद्धिमत्ता असणार्या प्रणाली या अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, काँप्युटर गेम्स (बुद्धिबळ इत्यादी) आणि संगणकप्रणाली यामध्ये वापरल्या जातात. माणूस करुन घेत असलेली कामं यंत्रमानवांकडून करून घेणं हा या तंत्रज्ञानाचा पाया आहे.

- Advertisement -

कृत्रिम बुद्धिमत्ताक्षेत्रातली ही झेप नजीकच्या काळात अनेक क्षेत्रांवर आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करेल. अनेक क्षेत्रं या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदलतील. येत्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात रोबो (यंत्रमानव) हा सर्वसामान्यांच्या जीवनातला महत्त्वपूर्ण घटक बनेल, असं सांगण्यात येतं. वैद्यकीय क्षेत्रात येत्या दहा वर्षांमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोंचा वापर करण्यात येईल. आजही काही सर्जनमंडळी गुढघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रोबोच्या सहाय्याने करत आहेतच. गेल्या वीसेक वर्षांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात रोबोच्या सहाय्याने अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. पण आता रोबो या क्षेत्रात विश्वासास पात्र ठरला असून सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया उत्तम रीतीने पार पाडू शकत आहेे. शिक्षणक्षेत्रातही रोबो शिक्षण सहाय्यक म्हणून काही प्रमाणात भूमिका बजावू लागेल. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या काही कंपन्या असे रोबो तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे विद्यार्थ्यांची समस्या समजावून घेऊन सोडवण्यास मदत करेल. ही अत्यंत छोटी उपकरणं बाळगायला आणि वाहून नेण्याला खूपच सोपी असतील

कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजवला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचे दूरगामी परिणाम होत आहेत. कोरोनाविरुद्धचं जागतिक युद्ध आता निर्णायक पातळीवर पोहोचत आहे. आतापर्यंत कोरोनाशी लढा देण्यासाठी 100 टक्के खात्रीदायक उपचार किंवा प्रतिबंधक लस उपलब्ध न झाल्याने हे युद्ध नक्कीच अवघड आहे. या अदृश्य शत्रूने अनेक देश, हजारो शहरं आणि लाखो वसाहती / उद्योगधंदे बंद केले आहेत. सध्या जगभर सर्वत्र सीसी टीव्ही कॅमेरे आहेत व ते सतत आजारी व्यक्तींच्या प्रतिमा साठवत असतात . या प्रतिमांचं त्वरित विश्लेषण करून कुठल्या व्यक्तीत तापाची लक्षणं आहेत हे त्वरित समजण्यासाठी बिग डेटा ऍनॅलिटिक तंत्र अनेक सरकारी कार्यालयं वापरत आहेत. कारण बाधित व्यक्ती ओळखणं आणि तिला त्वरित वेगळं करणं अतिमहत्वाचं आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये रोगाच्या उपचार आणि नियंत्रणासाठी लवकर निदान होणं महत्त्वपूर्ण आहे. याचं कारण सर्दी खोकल्याचे अनेक रुग्ण घाबरून आपली तपासणी करू इच्छितात आणि कोरोना चाचणीची केंद्रं मर्यादित आहेत.

कोरोनाच्या उद्रेकाने रेडिओलॉजी इमेजिंग विभागावर तणावपूर्ण दबाव आणला आहे. कारण हे तंत्रज्ञ आता दिवसभरात हजारो छयाचित्रांचं पृथःकरण करत आहेत. इथेच त्यांना तंत्रज्ञान मदत करू शकतं, इथेच कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला मदतीला येऊ शकते. मशिन लर्निंग, नॅचरल लॅँग्वेज प्रोसेसिंग उर्फ एनएलपी आणि कॉग्निटिव्ह कॉँप्युटिंग या तीन अतिशय प्रगत तंत्रज्ञानांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा डोलारा उभा आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकीय प्रणालीला माणसाप्रमाणे विचार करण्याची क्षमता प्राप्त व्हावी हा या प्रगत तंत्रज्ञानाचा उद्देश आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे तंत्रज्ञान पुढील वीस वर्षांमध्ये जगाचं चित्रच बदलून टाकणार आहे. वैद्यकीय, शिक्षण, दूरसंचार आदी क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला आहे. सध्या कृत्रिम उर्फ संगणकीय बुद्धिमत्तेबाबत बरंच संशोधन (आणि चर्चाही) सुरु आहे संगणक, सॉफ्टवेअर्स, ऍप्स, स्मार्टफोन्स यांच्या अनेकविध अभ्यासातून आणि सर्वेक्षणातून स्पष्टपणे दिसलं आहे की पारंपारिक मानवी डॉक्टरांपेक्षा आजाराचं निदान करण्याची संगणकीय क्षमता जास्त चांगली असून या रोगनिदानातल्या संभाव्य चुकांचं प्रमाण तितकंच कमी आहे. याला ‘एव्हिडन्स-बेस्ड डायग्नॉसिस’ असे नाव आहे.

अग्रेसर चीनी तंत्रव्यवसाय ‘अलिबाबा’ने अलीकडेच कोविड-19 चं निदान करण्यासाठी एआय सिस्टीम विकसित केली आहे. ही प्रणाली फोटोइमेजिंग (प्रतिमा विश्लेषण) तत्वावर काम करते. या प्रणालीला प्रतिमा पृथकरणाचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं; ज्यामध्ये कोरोना पुष्टीकरण झालेल्या पाच हजार रुग्णांची तपासणी झाली आहे. यावरून या प्रणालीने एकसमान दिसणार्‍या इतर प्रतिमा ओळखल्या आणि 96 टक्के वेळा कोरोनाचं अचूक निदान झालं आहे. यापूर्वीच चीनमधल्या एक हजार रूग्णालयात त्याची चाचणी घेण्यात आली आहे. या प्रोग्रॅमला रुग्णाच्या डोळे, घसा, जीभ या अवयवांच्या प्रतिमा स्कॅन करून अथवा लाईव्ह फीड कराव्या लागतात. यामुळे आपले फॅमिली डॉक्टरही सुमारे 15 सेकंदांमध्ये स्मार्ट विश्लेषणाचं निदान प्राप्त करू शकतात. फक्त ‘अलिबाबा’च या तंत्रात अग्रेसर नसून इतर उद्योगही आता पर्याय देत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी इन्फर्विझनने कोरोनाव्हायरस एआय सोल्यूशन सुरू केलं, जे आरोग्य कर्मचार्यांना रोगाचा प्रभावीपणे शोध घेण्यात आणि देखरेख करण्यास मदत करतं. ताप असणार्या आणि कोरोनाची लागण होण्याची शक्यता असलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी कृत्रिम इमेजिंग तंत्रज्ञानाने चेहरा ओळख तंत्रज्ञान आणि तापमान शोधन सॉफ्टवेअर वापरलं.

सध्या आपला देश कोरोनाप्रसाराच्या दुसर्या टप्प्यात आहे. देशाने कोरोनाप्रसाराच्या तिसर्या टप्प्यात प्रवेश करु नये, यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानाची मदत घेऊन हे काम सोपे होऊ शकते. .

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...