Thursday, May 2, 2024
Homeनगरमृत करोनाग्रस्त महिलेच्या अंगावरील सोने गायब

मृत करोनाग्रस्त महिलेच्या अंगावरील सोने गायब

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना उपचारादरम्यान मृत झालेल्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने पोलिसांकडे अर्ज देत जिल्हा रुग्णालयामधील सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी केली आहे.

भिंगार येथील वडारवाडी भागात राहणार्‍या महिलेस करोना झाला होता. तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयामधील आयसीयू एक नंबर वॉर्डातील 15 नंबर बेडवर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच महिलेचा मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयामध्ये महिलेस दाखल करताना तिच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. हे दागिने कोणीतरी काढून घेतले असल्याचे तिच्या मुलाचे म्हणणे आहे. मृत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेणार्‍यांचा शोध घेण्यासाठी तिच्या मुलाने शोधकार्य हाती घेतले आहे. 18 सप्टेंबरच्या दुपारी बारा ते रात्री 9 वाजेपर्यंतचे आयसीयू वॉर्डातील सीसीटीव्ही फुटेज मिळावे असे पत्र मुलाने जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांकडे दिले आहे.

त्याची एक प्रत तोफखाना पोलिसांकडेही पाठविण्यात आली आहे. दरम्यान मृत महिलेच्या मुलाने तोफखाना पोलिसांकडे करोनाने मृत झालेल्या आईच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब झाल्याचा तक्रार अर्ज दिला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांना पत्र देत तपासकामी सीसीटीव्ही फुटेज मिळावे,अशी मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या