Thursday, October 1, 2026
Homeक्राईमAhilyanagar : बनावट नोटांच्या टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश

Ahilyanagar : बनावट नोटांच्या टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष || बारामतीच्या तिघांना अटक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नागरिकांमध्ये अंधश्रध्दा निर्माण करून त्यांची फसवणूक करणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत बारामती (जि. पुणे) येथील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून 500 रूपयांच्या तब्बल 18 हजार 419 बनावट नोटा, पाच मोबाईल व कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बनावट नोटांची दर्शनी किंमत 92 लाख 9 हजार 500 रूपये आहे.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी (29 सप्टेंबर) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गणेश शेवाळे व त्याच्या साथीदारांकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष शेवाळे याच्या विनायक कॉलनी, वडगाव रोड येथील घराची झडती घेतली. त्यावेळी खोलीतील जिन्याखाली ठेवलेल्या पिशवीमध्ये भारतीय चलनाच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या कोर्‍या कागदाचे बंडल आढळून आले.

पोलिसांनी गणेश शेवाळे याच्यासह तिघांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. गणेश दिलीप शेवाळे (वय 33, रा. कोर्टाजवळ, अशोकनगर, बारामती), सुमित विकास चंदनशिवे (वय 25, रा. तांदुळवाडी, गुलमोहर सोसायटी, बारामती) आणि सुरज वसंत कांबळे (वय 27, रा. झारगडवाडी, बारामती) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्यासह पसार तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे तसेच अंमलदार विजय ठोंबरे, गणेश लोंढे, शाहीद शेख, संदीप पवार, विष्णू भागवत, सुयोग सुपेकर, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख, प्रशांत राठोड व भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली.

अंधश्रध्देचा आधार घेऊन फसवणूक
संशयित आरोपींनी यापूर्वी नागरिकांना पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून त्यांच्या मनात अंधश्रध्दा निर्माण केली. त्यानंतर विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी बनावट नोटांचा वापर केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे या टोळीच्या माध्यमातून आणखी किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

25 हजारांत आणल्या बनावट नोटा
पोलिसांनी अटकेतील तिघा संशयित आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, गणेश शेवाळे याने जप्त केलेल्या बनावट नोटा त्याचे साथीदार प्रताप धुमाळ (रा. बोल्हेगाव) आणि अशोक भिमराज दारकुंडे (रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी) यांच्या माध्यमातून मिळाल्याची माहिती दिली. अशोक दारकुंडे याच्या कारमधून मालेगाव येथील अम्मु (पूर्ण नाव माहिती नाही) नावाच्या व्यक्तीकडून 25 हजार रूपये देऊन बनावट नोटा आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...