राहाता |प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात निर्जन ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीच्या मोबाईल रॅकेटचा पोलिसांनी धाडसी कारवाईत भांडाफोड केला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गुप्तपणे सुरू असलेल्या या गैरप्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या कारवाईत एका डॉक्टरसह त्याच्या एजंटला अटक करण्यात आली असून तपासणीसाठी आलेल्या आठ गरोदर महिलांनाही पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेतलं आहे.
राहाता तालुक्यातील लोणी-निर्मळ पिंपरी रस्त्यालगत निळवंडे कालव्याच्या कडेला असलेल्या शेतातील दोन खोल्यांमध्ये हे बेकायदेशीर केंद्र उभारण्यात आलं होतं. बाहेरून कुणालाही संशय येऊ नये यासाठी अत्यंत निर्जन आणि आडवाटेच्या ठिकाणाची निवड करण्यात आली होती. वाहनातून पोर्टेबल वैद्यकीय साहित्य आणून तेथे तात्पुरत्या स्वरूपात मोबाईल क्लिनिक उभे केले जात होते. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना या रॅकेटबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ विशेष पथकाची स्थापना केली. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी कौशल्याने डिकॉय ऑपरेशन राबवले.
लोणी पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचार्याला बनावट गरोदर महिला म्हणून या ठिकाणी पाठवण्यात आले. त्या माध्यमातून या रॅकेटची खात्री पटताच पोलिसांनी अचानक छापा टाकला.त्या ठिकाणी दोन खोल्यांचे घर व त्यासमोर एक पत्र्यांची पडवी असून आतील खोलीमध्ये 2 पुरुष व बनावट महिला पोलीस ग्राहक मिळून आले. सदर इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे डॉ. राहुल आबासाहेब भनगे, (वय 34 वर्ष, धंदा बी.ए.एम.एस. डॉक्टर, रा.भानसहिवरे, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) अभिजीत दिलीप भुसाळ, (वय 30 वर्ष, धंदा- जे.एन.एम.नर्सिंग, रा. पिंपरी निर्मळ, ता. राहाता), असे सांगितले. त्यांना सदर ठिकाणी काय करत आहात अशी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही गरोदर महिलांकडून प्रत्येकी 10,000 रुपये घेऊन त्यांची युएसजी मशीनचे साहयाने गर्भलिंग तपासणी करुन गर्भ मुलगा आहे की मुलगी याची त्यांना माहिती देतो. व गर्भवती महिलांना आमच्याकडे तपासणी करीता एजंट अभिजीत भुसाळ याने आणले असल्याचे आरोपी डॉक्टर यांनी सांगितले. तसेच तेथील गर्भलिंग निदान करण्याकरीता आलेल्या 8 महिलांकडे विचारपूस करता त्या महिला बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव, पुणे येथुन त्यांचे नातेवाईकासह आल्या असून त्या सर्व 3 ते 4 महिन्याचे गरोदर आहेत व त्यांचे नातेवाईक बाभळेश्वर येथे थांबले असुन त्या महिलांना इटिंगा व वॅगनर कार मध्ये सदर ठिकाणी गर्भलिंग निदान तपासणी करीता आणण्यात आले आहे.
रु.कि.चे. लाईफ प्लस यु.एस.जी. लॅपटॉप प्रोब मशीन चार्जरसह, गर्भलिंग तपासणी वेळी गरोदर महिलांचे पोटावर सदर छाप्या दरम्यान घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असुन त्या ठिकाणी 4,50,000/-लावण्यासाठी वापरण्यात येणारे जेल, टोशु पेपर, 4 मोबाईल फोन, 59,000/- रुपये रोख रक्कम, कागदी चिठ्या, एक सिल्वर रंगाची स्विफ्ट कार नं. एम.एच.12 एच.की. 9436, एक पांढरे रंगाची इटिंगा कार नं.एम.एच.14 एच.डब्लु. 8642, एक लाल रंगाची वेंगनर कार एम.एच.17 सी.आर 4160 असा एकुण 24,09,100/- रुपये किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच वरील 8 महिलांचे प्रवरा मेडीकल ट्रस्ट, हॉस्पीटल लोणी येथे वैदयकीय तपासणी केली असता त्या गरोदर असल्याचे आढळुन आले आहे. सदर महिलांचे नातेवाईक /पती यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.
या रॅकेटमागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय असून गर्भलिंग तपासणीनंतर बेकायदेशीर गर्भपातही केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक पातळीवर सुरू करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टर, एजंट यांच्याशी निगडित इतर सहकार्यांचा शोधही पोलीस घेत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. युवराज आठरे, पो.स.ई. आशिष चौधरी, म.पो.स.ई. कोमल कुमावत, म.पो.स.ई. बेबी अण्णा शिंदे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.हे.कॉ. संदीप दरंदले, पो.हे.कॉ. सचिन धनाड, पो.कॉ. अशोक गाडे, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.हे.कॉ. असिर सय्यद, पो.हे.कॉ. साईनाथ राशिनकर, पो.ना. सचिन शेवाळे, पो.कॉ. भोईटे, म.पो.कॉ. मनिषा गिरी यांनी केली आहे.




