श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार असल्याने आजपासून साधारण एक आठवडाभर दि. 18 ते 22 तारखेपर्यंत शहराला पूर्वीप्रमाणे दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर मात्र पुढील नियोजनासाठी शहराला सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस (दोन दिवसाआड) पाणी दिले जाईल. तसेच दि. 15 डिसेंबरनंतर जेव्हा शेतीसाठी आवर्तन सुटेल, त्या काळातही नागरिकांना दररोज पाणी मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष करण ससाणे आणि आमदार हेमंत ओगले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करणार्या श्रीरामपूरकरांना दिलासा मिळणार आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देताना नगराध्यक्ष ससाणे व आमदार ओगले म्हणाले की, भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटले असून शहराला 18 तारखेपर्यंत पाणी पोहोचेल. त्यानुसार दि. 18 ते दि. 22 तारखेपर्यंत शहराला दररोज पाणीपुरवठा होईल. शनिवारी महावितरणच्या लोडशेंडींगमुळे टाक्या भरण्यास 16 ते 17 तासांचा अडथळा येत असल्याने शनिवार आणि रविवार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुढे दि. 15 डिसेंबर रोजी शेतीसाठी रब्बीचे आवर्तन सुटणार आहे. त्या काळात (सुमारे 23-25 दिवस) शहराला पुन्हा दररोज पाणी दिले जाईल.
शेतीचे आवर्तन संपल्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. तर दुष्काळी परिस्थिती अद्याप टळलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण ससाणे यांनी केले. शहरातील पाणीप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फर शेख, दत्तात्रय सानप, नगरसेविका वैशाली चव्हाण, मंजुश्री मुरकुटे, नगरसेवक आशिष धनवटे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
नवीन तलावाचे काम रात्रंदिवस सुरू
शहरातील नवीन साठवण तलावाच्या कामाचा आढावा देताना ससाणे यांनी सांगितले की, सध्या तिथे रात्रंदिवस काम सुरू असून 77 ते 78 कामगार कार्यरत आहेत. काँक्रिट भरण्यासाठी अत्याधुनिक पॉवर लिफ्टिंग मशीन उपलब्ध आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत हा बॅलन्सिंग टँक पूर्ण क्षमतेने ताब्यात घेऊन त्यात पाणी साठवण्याचे नियोजन आहे. हा तलाव पूर्ण झाल्यानंतर शहराची 60 ते 65 दिवसांची (आणि दिवसाआड दिल्यास 160 दिवसांची) पाण्याची सोय कायमस्वरूपी होणार आहे.




