अकोले |प्रतिनिधी| Akole
उत्तर नगर जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर निळवंडे धरणातून रविवारी (दि.15) दुपारी बिगर सिंचन आवर्तनाकरिता एक हजार दोनशे क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच डाव्या उच्चस्तरीय कालव्यातून काल रात्री 9.30 वाजता पाणी सोडण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थिती व पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शेतकरी यांचेकडून आवर्तन सोडण्याची मागणी मागील काही दिवसांपासून करण्यात येत होती.
भंडारदरा धरणातून बिगर सिंचनाचे, तर निळवंडे धरणातून सिंचनाचे आवर्तन रविवारपासून सोडण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी दिले होते. त्यानुसार रविवारी दुपारी चार वाजता निळवंडे धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून आठशे क्युसेक तर विमोचकामधून चारशे क्युसेक असा एकूण बाराशे क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. हे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी असल्यामुळे नदी काठच्या गावांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
अकोले तालुक्यासाठी असणार्या डाव्या उच्चस्तरीय कालव्यातून दहा क्युसेकने विसर्ग सुरू होता. निळवंडे धरणातून सिंचनाचे आवर्तन दुपारी चार वाजता सोडण्यात आले. साधारण पाच दिवस हे आवर्तन सुरु राहणार असून या आवर्तनात 500 दलघफू पाणी वापर होण्याची शक्यता आहे. आवर्तन सोडतेवेळी निळवंडे धरणात 5 हजार 464 (65.56 टक्के) दलघफू पाणीसाठा होता. तर रविवारी सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 10 हजार 28 दलघफू होता.




