अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar
अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवत एक मोठे बनावट नोटांचे रॅकेट उध्द्वस्त केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज एमआयडीसी परिसरात सुरू असलेला हा बनावट नोटांचा उद्योग उध्द्वस्त करत पोलिसांनी सात जणांना गजाआड केले. मात्र या सार्या रॅकेटचा मास्टरमाईंड अंबादास ससाणे (रा. शहरटाकळी, ता. शेवगाव) हा अद्याप पसार आहे. सन 2015 पासून बनावट चलन निर्मितीचा काळा उद्योग सुरू ठेवणारा ससाणे हा गुन्हेगारी जगतात नोटांचा ‘किंगपिन’ म्हणून ओळखला जातो.
दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी 60 लाखांहून अधिक किंमतीच्या बनावट नोटा आणि सुमारे सव्वा दोन कोटी रूपयांच्या नोटा छापण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि प्रभारी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी या कारवाईचे नेतृत्व करत ‘ऑपरेशन फेक करन्सी’ यशस्वी केले. सात जण गजाआड केले असले तरी ससाणे अद्याप पसार आहे. त्याच्या पंटरकडून काही माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.
ससाणेवर आधीच छावणी, पुंडलीकनगर (जि. छत्रपती संभाजीनगर), तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्यांमध्ये यासंबंधी गुन्हे दाखल आहेत. तुरूंगवासानंतर सुधारणेच्या ऐवजी त्याने पुन्हा जुनाच उद्योग सुरू केला हे विशेष. ससाणेने वाळुंज एमआयडीसीत हुबेहूब 500 रूपयांच्या नोटांसारख्या बनावट नोटांचा कारखाना उभारला होता. अत्यंत बारकाईने छपाई, सेफ्टी फीचर्ससह अस्सल वाटाव्या अशा या नोटा आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोका निर्माण करणार्या होत्या. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात जणांमध्ये काही सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. अनिल पवार व आकाश बनसोडे या संशयित आरोपींवर यापूर्वी खून व खूनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल आहेत.
बीड जिल्ह्यातील प्रदीप कापरे आणि कर्जत येथील निखील गांगर्डे यांच्यातील व्यवहारातून हे रॅकेट आणखी विस्तारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बनावट नोटांचा वापर बहुतेक किरकोळ खरेदीमध्ये केला जात होता. आंबिलवाडी येथील टपरीवरच्या एका सामान्य दुकानदाराने घेतलेली सावधगिरी ही या संपूर्ण प्रकरणाचा उगम ठरली. बनावट नोटा इतक्या हुबेहूब होत्या की त्या ओळखणे देखील अवघड होते. त्यामुळे हा प्रकार वर्षानुवर्ष सुरू असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, राहुरी नंतर अहिल्यानगर तालुक्यात बनावट नोटाचे प्रकर समोर आल्यानंतर पोलिसांनी सावध भूमिका घेतली. या नोटा जिल्ह्याबाहेर तयार करून त्या जिल्ह्यात पाठविल्या जात असल्याचे लपून राहिलेले नाही.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक घार्गे यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांना पत्र पाठवून, भविष्यात बनावट नोटा आढळल्यास तत्काळ माहिती देण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले आहे. बँक प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याचीही तयारी सुरू आहे. नागरिकांनाही नोटा पारखून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अहिल्यानगर तालुका पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे, मात्र ही साखळी कुठे संपते, हे उलगडणे अजून बाकी आहे. ससाणे गजाआड केल्यानंतर या संदर्भातील आणखी खुलासे होणार आहे.
काळी गुंतवणूक आणि सुसज्ज तंत्रज्ञान
ससाणे हा वर्षानुवर्ष बनावट नोटा तयार करण्याचे उद्योग करत आहे. त्यामुळे तो या धंद्यात मास्टर झाला आहे. त्याने बनावट नोटा छापण्यासाठी लागणारी मशीन भोपाळहून मागवली होती. ते मशीन वाळुंज एमआयडीसीतील भाड्याने घेतलेल्या घराच्या पत्तावर पोहच झाली. तर नोटांसाठी लागणारा विशेष कागद मुंबईहून कुरिअरने मागवण्यात आला. हे सगळे काम अत्यंत नियोजनपूर्वक होत होते. बनावट नोटांच्या व्यवहारात वापरले जाणारे सिमकार्ड देखील बनसोडेच्या नावावर खरेदी करण्यात आले होते.
कायदा काय सांगतो ?
भारतीय न्याय संहिता कलम 179 व 180 अंतर्गत बनावट नोटा खर्या समजून वापरणे, विकणे, वितरित करणे किंवा साठवणे हा गंभीर अजामीनपात्र गुन्हा आहे. यामध्ये आजीवन कारावास, किंवा दहा वर्षांपर्यंतची शिक्षा व दंड, याची तरतूद आहे.





