अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पेट्रोल भरण्याच्या कारणावरून पेट्रोलपंपावरील कर्मचार्याशी झालेल्या वादाचे पर्यवसान थेट तोडफोड आणि मारहाणीत झाले. अहिल्यानगर-कल्याण रोडवरील ठाणगे पेट्रोलपंपावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी गज घेऊन धुडगूस घातला. यावेळी पंपाचे मॅनेजर संतोष भगवान दरेकर यांनाही मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (28 नोव्हेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, याप्रकरणी पेट्रोल पंपावरील कर्मचारी किंवा मालक यांनी पोलिसांत फिर्याद दिली नाही. यासंदर्भात पोलीस अंमलदार भागवत बांगर यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार अनोळखी आठ ते दहा जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ठाणगे पेट्रोलपंपावर मारामारी सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. त्यानंतर तोफखाना पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पेट्रोलपंपावर तोडफोड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनास्थळी चौकशी केली असता, पेट्रोल भरण्याच्या कारणावरून पंपावर काम करणारा विनीत अडागळे याच्यासोबत काही जणांचा वाद झाला होता. या वादानंतर काही वेळातच आठ ते दहा अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी पंपावरील कार्यालयाच्या काचा तसेच ऑईल ठेवण्याच्या रॅकच्या काचा फोडल्या. पंपावरील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत मोठ्या प्रमाणात नासधूस केली. पंपाचे मॅनेजर संतोष दरेकर यांना हल्लेखोरांनी लक्ष्य केले. जखमी दरेकर यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पेट्रोलपंप परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
फिर्याद देण्यास नकार
आठ ते 10 जणांच्या टोळक्याने पेट्रोल पंपावर धुडगूस घातल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पंपाच्या मालकांनी माध्यमांशी बोलताना केली होती. मात्र त्यांनी किंवा कर्मचार्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही. या घटनेत पोलीस स्वत: फिर्यादी झाले आहेत. ऐवढी मोठी गंभीर घटना होऊन देखील फिर्याद देण्यास टाळाटाळ झाल्याचे दिसून येते.




