अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात घडलेल्या घटनांनी जिल्ह्याची प्रतिमा अक्षरशः डागाळली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, टोळीयुध्द, दरोडे, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, रस्तालूट, गावठी कट्ट्यांचा वाढता वापर, सायबर आणि आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांवर ड्रग्स तस्करीसारखे गंभीर आरोप, गुटखा प्रकरणातील संशयास्पद भूमिका, बनावट दूधाच्या तपासावर संशय तसेच गंभीर गुन्ह्यांच्या तपासातील अपयश यामुळे पोलीस दलाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या खांद्यावर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पुन्हा रूळावर आणण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. मात्र हे आव्हान केवळ गुन्हेगारीपुरते मर्यादित नाही. पोलीस दलातील अंतर्गत राजकारण, राजकीय हस्तक्षेप, कामचुकार पोलिसांचे वाढते जाळे आणि काम करणार्या अधिकारी-अंमलदारांची होणारी उपेक्षा हीदेखील मोठी डोकेदुखी ठरत आहे.
गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात दोन गटांतील संघर्षाच्या घटना वारंवार घडत आहे. किरकोळ वादातून थेट खून आणि गोळीबारापर्यंत प्रकरणे पोहोचत असल्याने सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. गावठी कट्ट्यांचा वाढता वापर हा पोलिसांसमोर गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. दुसरीकडे चोरी, घरफोडी, जबरी चोरी आणि दरोड्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अनेक गुन्ह्यांचा तपास महिनोनमहिने प्रलंबित राहतो. पोलीस ठाणे स्तरावर तातडीने तपास होणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी निष्क्रियता दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असली तरी त्या मानाने तपास आणि गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. अनेक पीडित नागरिक आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
दुसरीकडे पोलीस दलातील अंतर्गत राजकारण हा सध्या टोकाचा विषय ठरत आहे. विशेषतः गुन्हे शोध पथकात किंवा शहरातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये पोस्टिंग मिळवण्यासाठी मोठी धडपड सुरू असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासून शहरातील पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील शाखांमध्ये कार्यरत असलेले काही अंमलदार पुन्हा शहरातच थांबण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. यात काही अधिकारी-अंमलदार खरोखरच उत्कृष्ट काम करणारे असले तरी काही जण मात्र कामापेक्षा खात्याविरोधी हालचाली आणि ‘व्यवस्था’ करण्यातच अधिक सक्रिय असल्याची टीका होत आहे. यामुळे प्रत्यक्ष गुन्हे उघडकीस आणणारे, तपासात हातखंडा असलेले अंमलदार मागे पडत असल्याचे चित्र आहे. परिणामी खात्यातील प्रामाणिक अंमलदारांमध्ये नाराजी वाढत आहे.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांच्या कामकाजाबाबत नागरिक सातत्याने तक्रारी करत आहेत. काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात दिरंगाई, तपासातील हलगर्जीपणा, नागरिकांशी असभ्य वर्तन, तसेच वाढती राजकीय हस्तक्षेपाची भावना यामुळे पोलीस प्रशासनाविषयी अविश्वास वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही प्रभारी अधिकार्यांबाबत वरिष्ठ अधिकारीही नाराज असल्याची चर्चा आहे. ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे त्यांची बदली जवळपास निश्चित मानली जात असली तरी कामगिरी समाधानकारक नसलेल्या अधिकार्यांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या कामाची शैली कठोर आणि अभ्यासू मानली जाते. त्यामुळेच जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते मोठे निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र केवळ बदल्या करून परिस्थिती बदलणार नाही. त्यासाठी सक्षम, प्रामाणिक आणि काम करणारी टीम उभी करणे आवश्यक आहे. गुन्हे उघडकीस आणण्याची क्षमता असलेल्या अधिकारी-अंमलदारांना पुढे आणणे, राजकीय दबावाला बळी न पडणे, स्थानिक गुन्हे शाखेला पुन्हा सक्रिय करणे आणि पोलीस दलातील अंतर्गत शिस्त मजबूत करणे ही त्यांच्यासमोरील खरी परीक्षा असेल.
एलसीबीवर प्रश्नचिन्ह
एकेकाळी जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांची काही तासांत उकल करणारी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आज स्वतःच प्रश्नांच्या भोवर्यात सापडली आहे. या शाखेत तब्बल आठ अधिकारी आणि सुमारे 62 अंमलदारांची फौज असूनही अपेक्षित कामगिरी होत नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. गंभीर गुन्ह्यांचे तपास या शाखेकडे असूनही गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले अपयश वरिष्ठांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. काही अधिकारी आणि अंमलदारांविरोधात गंभीर तक्रारीही झाल्याचे बोलले जात आहे. मागील आठवड्यात अधीक्षक सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेची चांगलीच झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शाखेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘परफॉर्मन्स’वर होणार निर्णय ?
जिल्हा पोलीस दलात येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बदल्या होण्याची शक्यता आहे. अधिकारी आणि अंमलदार यांच्यात योग्य ठिकाणी पोस्टिंग मिळवण्यासाठी सध्या मोठी चढाओढ सुरू झाली आहे. पुढील महिन्यात शाळा सुरू होत असल्याने अनेक कर्मचार्यांच्या मुलांच्या प्रवेश प्रक्रियेचा प्रश्न आहे. त्यामुळे बदल्यांबाबत हालचालींना वेग येण्याची अपेक्षा होती. मात्र नवीन अधीक्षक नुकतेच पदावर आल्याने संपूर्ण माहिती घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे बोलले जात आहे. दरम्यान नियंत्रण कक्षात अनेक सक्षम अधिकारी पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कामाचा योग्य वापर करून त्यांना जबाबदारी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




