Tuesday, March 31, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगरात ‘खाकी’वरच हल्ले

Ahilyanagar : अहिल्यानगरात ‘खाकी’वरच हल्ले

महिनाभरातील सहा घटनांनी उघड केला गंभीर प्रश्न || पोलिसांचा धाक का कमी होतोय?

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन समाजरक्षणासाठी 24 तास तत्पर असलेल्या पोलिसांवरच हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंताजनक स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. गेल्या अवघ्या महिनाभरात शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर, राहुरी, राहाता आणि नगर परिसरात पोलिसांवर सहा गंभीर हल्ल्यांच्या घटना घडल्या असून, या घटनांनी पोलिसांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गुन्हेगारांना आवर घालणार्‍या ‘खाकी’चा दरारा कमी होत चालल्याचे हे ठळक संकेत मानले जात आहेत. पोलीस खात्यावर वाढता राजकीय हस्तक्षेप, अंतर्गत फूट आणि नागरिकांमध्ये वाढती नाराजी या पार्श्वभूमीवर पोलिसांची प्रतिमा आणि प्रभाव ढासळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पूर्वी सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांवर हल्ले होत असत; मात्र आता सर्वसामान्य नागरिकही किरकोळ कारणावरून पोलिसांवर हात उगारू लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडणारे पोलीस स्वतःच असुरक्षित होत चालले आहेत. ही केवळ कायदा- सुव्यवस्थेची समस्या नाही, तर ती सामाजिक मानसिकतेतील बदलाची गंभीर चिन्हे आहेत.

- Advertisement -

पूर्वी गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ले होत असत, हे काही नवीन नाही. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. किरकोळ कारणांवरून, वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच नागरिकांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. 21 फेब्रुवारी रोजी शेवगाव पोलीस ठाण्यासमोर दोन गटांतील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस अंमलदाराला तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच दिवशी पाथर्डी तालुक्यातील आल्हनवाडी येथे आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर कुर्‍हाडीने हल्ला करण्यात आला. या घटनेत एका पोलीस अंमलदारावर जीवघेणा वार करण्याचा प्रयत्न झाला. श्रीरामपूरमधील मिल्लतनगर येथे हद्दपार गुन्हेगाराला पकडताना पोलिसांवर दगडफेक झाली. अतिरिक्त कुमक बोलावून आरोपीला ताब्यात घ्यावे लागले.

8 मार्च रोजी राहुरी येथे वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस अंमलदाराला प्रथम शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. त्यानंतर रात्री मद्यधुंद जमावाने फायटर, लोखंडी गज व लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केला. एकाच दिवशी दोनदा पोलिसांना लक्ष्य करण्यात आले, ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे. 11 मार्च रोजी राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे शिवारात संशयास्पद ट्रक थांबवून चौकशी करणार्‍या महिला पोलिसांवर चालकाने ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा इशारा मानली जात आहे. 26 मार्च रोजी दरेवाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकावर सुमारे 100 जणांच्या जमावाने हल्ला केला. ओळखपत्र दाखवूनही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत सात पोलीस किरकोळ जखमी झाले असून, शंभर जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटना केवळ अपवाद नाहीत, तर त्या एका मोठ्या बदलाचे लक्षण मानले जात आहे. पोलिसांविषयीची भीती आणि आदर कमी होत चालला असल्याचे दिसून येत आहे.

एकेकाळी स्थानिक गुन्हे शाखेचा जिल्ह्यात प्रचंड दरारा होता. गुन्हेगार एलसीबीच्या नावानेही सावध राहत. मात्र, आज परिस्थिती उलट होत चालली आहे. एलसीबी पथकांवर किरकोळ कारणांवरून हल्ले होणे, त्यांचे वादात अडकणे, गुन्हे उकलण्यात अपयश येणे या सगळ्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होत असल्याचे स्पष्ट दिसते. गुन्हेगारांमध्ये निर्माण होणारी भीती हीच कायदा-सुव्यवस्थेची खरी ताकद असते. तीच जर कमी झाली, तर गुन्हेगारीला आळा घालणे कठीण होते.
पोलिसांवरच हल्ले होत असतील, तर सामान्य नागरिकांची सुरक्षा कितपत मजबूत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पोलीस दलामागे वरिष्ठांनी ठामपणे उभे राहणे, अंतर्गत शिस्त मजबूत करणे आणि ‘खाकी’चा दरारा पुन्हा निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे.

जनतेतील असंतोष
हल्ले होण्यामागे पोलिसांविषयी जनतेत वाढणारा असंतोष हेही एक महत्त्वाचे कारण आहे. काही ठिकाणी पोलिसांची वागणूक, भ्रष्टाचाराचे आरोप, किंवा पक्षपाती कारवाई यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. जेव्हा नागरिकांना न्याय मिळत नाही असे वाटते, तेव्हा ते कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच किरकोळ वादातही पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. पोलिसांवर होणारे हल्ले ही केवळ पोलिसांची समस्या नाही, तर ती संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. पोलिसांचा धाक कमी झाल्यास गुन्हेगारी वाढू शकते, कायदा-सुव्यवस्था ढासळून सामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, पोलिसांचा मनोबल खालावल्याने त्यांची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता आहे.

राजकीय हस्तक्षेप, मोठा अडथळा
पोलिसांवरील हल्ल्यांमागे केवळ बाह्य कारणे नाहीत, तर अंतर्गत समस्याही तितक्याच गंभीर आहेत. पोलीस खात्यावर वाढता राजकीय हस्तक्षेप, निर्णय प्रक्रियेतील दबाव, आणि काही पोलिसांची फितुरी वृत्ती अशा गोष्टी पोलिसांची एकजूट आणि कार्यक्षमता कमी करत आहेत. काही घटनांमध्ये पोलिसांवर हल्ला झाल्यानंतरही आरोपींवर कठोर कारवाई न करता त्यांना मदत केल्याचे आरोप झाले आहेत. अशा प्रकारांमुळे पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. पोलिसांवर हल्ला करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असून अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यास तो झुगारून काम करणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Crime News : खरातने यूट्यूबर्सनाही केले मालामाल; कर्जदारांमध्ये खुशीची लहर

0
सिन्नर | विलास पाटील | Sinnar व्यवसायात बरकत करून देतो म्हणून अनेक भक्तांना वेगवेगळे मार्ग दाखवून गंडवणाऱ्या कॅप्टन अशोककुमार खरात (Ashok Kharat) याच्यामुळे मालामाल झाल्याचे...