नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रस्ते कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून ३ लाख रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribe Department) पथकाने झेडपीच्या उपविभागीय अभियंत्याला अटक केली. कारवाई पथकाने जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सोमवारी (दि. ३०) केली. या प्रकरणातील शाखा अभियंता फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. विठ्ठल बालाजी पठाडे (५६) असे अटक (Arrested) केलेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग, चांदवडच्या उपविभागीय अभियंत्याचे नाव आहे. तर कृष्णकांत जिभाऊ देवरे (२८) असे फरार झालेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain News : दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात गारांसह पाऊस; निफाड, सिन्नर, बागलाणला अवकाळीचा फटका
तक्रारदाराने जिल्हा परिषद (Nashik Zilla Parishad) बांधकाम विभागामध्ये कंपनी नोंदणीकृत केली आहे. त्यांच्या कंपनीच्या नावाने (ता. हद्द ते बच्छाव वस्ती उसवाड कळमदरे, डोंगरगाव निकम वस्ती ते रामा-२४ रस्ता) इजिमा २७९ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी चांदवड तालुका अंदाजपत्रक रक्कम ९० लाख रूपयांची निविदा प्रसिद्ध झाली. त्यापैकी तक्रारदारांना ७२ लाख ८९ हजार ७२८ रूपये पार्टनुसार रस्ता डांबरीकरणाचे काम मिळाले होते. या कामाचे टप्प्याटप्प्याने तक्रारदारांना ४१ लाख रूपये मिळाले होते. उर्वरित १० लाख रुपये बिल येणे बाकी होते. या बिलाची मागणी तक्रारदाराने पंचायत समिती कार्यालयात केली होती. मात्र, तक्रारदारांना आधीच्या बिलाच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून आणि सध्याचे बिल बनवून मंजूर करण्यासाठी विठ्ठल पठाडे याने ३ लाख रूपये आणि कृष्णकांत देवरे याने २ लाख ६७ हजार रूपये लाचेची मागणी केली.
हे देखील वाचा : Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना खरात प्रकरणात अद्याप SIT ची नोटीसच नाही! चौकशीच्या केवळ चर्चाच
तक्रारदाराला दोघांना एकूण ५ लाख ६७ हजार रूपये द्यायचे नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाकडे सोमवारी (दि.३०) तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. जिल्हा परिषद कार्यालयात तक्रारदराकडून ३ लाख रूपये स्वीकारताना पथकाने सायंकाळी ४.४५ मिनिटांनी पठाडे यास अटक केली. संशयित देवरे याने चांदवड येथील स्वतःच्या घरी २ लाख ६७ हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. देवरे हा फरार असून, पथक त्याच्या मागावर आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडी पुन्हा वाढवली, आज कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती




