Tuesday, December 3, 2024
Homeनगरजेवणासाठी थांबलेल्या नेवाशाच्या तिघांना मारहाण करून लुटले

जेवणासाठी थांबलेल्या नेवाशाच्या तिघांना मारहाण करून लुटले

चास शिवारातील घटना || सात जणांविरूध्द तालुका पोलिसांत दरोड्याचा गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर- पुणे महामार्गावरील चास (ता. नगर) शिवारात हॉटेल चूल मटन येथे जेवणासाठी थांबलेल्या नेवासा तालुक्यातील तिघांना मारहाण करून त्यांच्याकडील 15 हजाराची रोकड लुटली. मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत. रविवारी (10 नोव्हेंबर) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. डॉ.योगेश विजयकुमार झावरे (वय 30 रा. कारखाना पेट्रोल पंपासमोर, भेंडा फॅक्टरी, ता. नेवासा), अनिल गंगाराम सापते (वय 24) व सुनील काशीनाथ आडागळे (वय 30 दोघे रा. सौंदाळा, ता. नेवासा) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी डॉ. झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात प्रवीण फलके (पूर्ण नाव नाही) व त्याच्या सोबतच्या अनोळखी सहा जणांविरूध्द सोमवारी (11 नोव्हेंबर) दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

रविवारी रात्री नऊच्या सुमारास डॉ.झावरे, अनिल सापते व वाहन (एमएच 12 एक्सडब्ल्यू 0304) वरील चालक सुनील आडागळे हे तिघे चास शिवारातील हॉटेल चूल मटन येथे जेवण करण्यासाठी थांबले होते. त्यांनी त्यांच्याकडील वाहन हॉटेल चूल मटनच्या बोर्ड जवळ वॉचमनच्या सांगण्यावरून उभे केले होते. दरम्यान, आडागळे हे वाहनातून खाली उतरत असताना हॉटेल चूल मटनच्या शेजारी असलेल्या हॉटेल जत्रा मधील प्रवीण फलके हा त्यांच्याजवळ आला व वाहन लावण्याच्या कारणावरून चालक आडागळे यांना शिवीगाळ केली. वाहनाचा दरवाजा जोरात ढकलून दिल्याने आडागळे यांच्या छातीला लागले.

त्यानंतर डॉ. झावरे व सापते हे हॉटेल चूल मटनमध्ये गेले व काउंटरसमोर असताना प्रवीण फलके व त्याच्यासोबत अनोळखी दोघांनी येऊन डॉ. झावरे व सापते यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच वेळी आडागळे हे वाहनाजवळ असताना हॉटेल जत्रामधून आलेल्या अनोळखी चौघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील 15 हजार रुपयाची रोकड बळजबरीने काढून घेतली. मारहाण करून ते सर्व जण तेथून निघून गेले. जखमींनी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या