Wednesday, November 18, 2026
HomeनाशिकAshok Kharat Case : भोंदू खरातवर आरोप निश्चितीसाठी ३० नोव्हेंबरची मुदत; मुंबईतील...

Ashok Kharat Case : भोंदू खरातवर आरोप निश्चितीसाठी ३० नोव्हेंबरची मुदत; मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भक्तांची आर्थिक फसवणूक (Fraud) आणि ४२ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुरू असलेल्या अशोककुमार एकनाथ ऊर्फ कॅप्टन खरात (Ashok Kharat) आणि त्याच्या साथीदारांवरील खटल्याच्या कारवाईला वेग आला आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात सोमवारी (दि. १६) पार पडलेल्या सुनावणीत, संशयितांच्या वकिलांकडून आराेप निश्चितीच्या सुनावणीत सहकार्य केले जात नसल्याची गंभीर दखल विशेष न्यायालयाने घेतली आहे. खटला जलदगतीने चालवणे आवश्यक असतानाही बचाव पक्षाकडून टाळाटाळ होत असल्याने, न्यायालयाने या प्रकरणातील दाेषनिश्चितीच्या आदेशासाठी ३० नोव्हेंबरची तारीख दिली आहे.  

- Advertisement -

​सोमवारी झालेल्या सुनावणीत (Hearing) सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) विशेष सरकारी वकिल अरविंद आघाव, ऋषभ शुक्ला आणि सौरभ पांडेय हे उपस्थित होते. मात्र, संशयित खरात, नामकर्ण आवारे, अविनाश कांडेकर, मिलिंद बनकर आणि खरातची, पत्नी कल्पना यांचे वकील न्यायालयात हजर असले, तरी त्यांच्यापैकी कोणीही आरोप निश्चितीच्या सुनावणीसाठी पुढे येण्यास तयार झाले नाही.  

​त्यावर न्यायालयाने (Court) तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. संशयित अशोककुमार खरात हा कच्चा कैदी असल्याने हा खटला लवकरात लवकर चालवून पूर्तता करणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांकडून कोणतीही बाजू घेतली जात नसल्याने न्यायालयाने आरोप निश्चितीबाबत स्पष्ट केले असून, या प्रकरणाची (Case) सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.  

गैरहजर संशयितांना वॉरंटचा बडगा

या प्रकरणातील मुख्य संशयित अशोककुमार खरात याला नाशिक कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. तर, संशयित अरविंद बावके आणि मिलिंद बनकर हे गैरहजर असल्याने, तसेच काही संशयितांच्या वकिलांनी अनुपस्थिती अर्ज सादर केल्याने न्यायालयाने त्यांना शेवटची संधी दिली आहे. पुढील सुनावणीला सर्व संशयितांना उपस्थित राहण्याचे अनिवार्य केले आहे. अन्यथा न्यायालय कठोर पावले उचलेल, असे स्पष्ट केले. 

प्रकरणाची पार्श्वभूमी

ईडीने या प्रकरणात अशोककुमार खरातविरुद्ध सुमारे तीन हजार पानांचे सविस्तर दोषारोपपत्र दाखल केले आहे. नाशिकसह सिन्नर, शिर्डी आणि राहता परिसरात खरातविरुद्ध १७ गंभीर गुन्हे दाखल असून, त्याने दैवी शक्तीचा दावा करून आणि चमत्कारांचे आमिष दाखवून भोळ्याभाबड्या भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. खरातने भक्तांची दिशाभूल करून सुमारे ४२ कोटी ८८ लाख रुपयांचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, यात त्याच्या पत्नीसह (कल्पना खरात) अन्य साथीदारांचाही सहभाग आहे. या प्रकरणात ईडीने तब्बल ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, स्थावर मालमत्ता व रोख्यांच्या स्वरूपात माया जमवल्याचे उघडकीस आले आहे. 

ताज्या बातम्या

अंबड पोलिसांची टवाळखोर व मद्यपींवर कारवाई

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik परिसरात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, टवाळखोरी आणि मद्यपान करून उपद्रव करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी अंबड पोलिसांनी मंगळवारी (दि. १७) सायंकाळी...