Wednesday, November 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसप्तशृंगी गड : संकटात सापडलेल्या भाविकाला टॅक्सी चालकांनी केली आर्थिक मदत

सप्तशृंगी गड : संकटात सापडलेल्या भाविकाला टॅक्सी चालकांनी केली आर्थिक मदत

सप्तशृंगीगड | वार्ताहर Saptshrungi Gad

- Advertisement -

धार्मिक स्थळांवर माणुसकी, आपुलकी आणि सेवाभावाचे दर्शन घडत असते. याचाच प्रत्यय श्रीक्षेत्र सप्तशृंगीगडावर पुन्हा एकदा आला. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची पैशांची पर्स हरवल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली. मात्र, या संकटाच्या प्रसंगी सप्तशृंगीगड व नांदुरी येथील टॅक्सी वाहनचालकांनी पुढाकार घेत एकत्रितपणे पैसे जमा करून संबंधित भाविकाला आर्थिक मदत केली. टॅक्सी चालकांच्या या माणुसकीच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून आलेले भाविक सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी गडावर आले होते. दर्शनासाठी आलेल्या या भाविकाची पैशांची पर्स हरवल्याने त्यांची मोठी अडचण झाली. परगावाहून आलेले असल्याने पुढील प्रवास तसेच इतर आवश्यक खर्च कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता.

ही बाब सप्तशृंगीगड व नांदुरी येथील टॅक्सी वाहनचालकांच्या निदर्शनास येताच त्यांनी केवळ व्यवसायापुरता विचार न करता माणुसकीला प्राधान्य दिले. सर्व वाहनचालकांनी आपापल्या परीने आर्थिक हातभार लावत पैसे जमा केले आणि अडचणीत सापडलेल्या भाविकांना मदतीचा हात दिला.

या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात सिद्धार्थ आहिरे, मनोज तिवारी, हेमंत कानडे, गौतम आहिरे, संतोष तिवारी, बापू काळे, नाना राठोड, जितू आहिरे, आबा कानडे, श्रावण आहिरे, मंगेश आहिरे, कैलास राऊत, अशोक राऊत, रवी दळवी, गणेश कानडे, संतोष गवारे, रोहित जाधव, नाना गवळी, शैलेश गांगुर्डे आणि सोनू गांगुर्डे यांच्यासह इतर वाहनचालकांनी सहभाग घेतला.

विशेष म्हणजे, कोणताही स्वार्थ किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता केवळ संकटात सापडलेल्या भाविकांना मदत करण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सप्तशृंगीगडावर येणारे भाविक हे केवळ पर्यटक किंवा प्रवासी नसून आई जगदंबेचे भक्त आहेत आणि त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे, अशी भावना या कृतीतून वाहनचालकांनी व्यक्त केली.

व्यवसायापलीकडे जपली माणुसकी!
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात दुसऱ्याच्या अडचणीला धावून जाणारी माणसे समाजासाठी खऱ्या अर्थाने आदर्श ठरतात. सप्तशृंगीगड व नांदुरी येथील टॅक्सी वाहनचालकांनी दाखविलेला सेवाभाव हा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून सप्तशृंगीगडाच्या माणुसकीच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा आहे.

आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी आलेल्या परराज्यातील भाविकांना अनोळखी भूमीत आपलेपणाचा आधार मिळाला. त्यामुळे टॅक्सी वाहनचालकांच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांसह भाविकांकडून कौतुक होत असून, ‘सप्तशृंगीगडावर केवळ देवीचे दर्शनच नाही, तर माणुसकीचेही दर्शन घडते’ अशी भावना व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Newasa : अहिल्यानगर जिल्ह्याकरिता दीड लाख कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचनांचे लक्ष्य

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडून जलशक्ती अभियान-कॅच द रेन20260 अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा ग्रामीण व महानगरपालिका विभागात एकूण 34 लाख...