पुणे | Pune
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील (Pune) शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा एका व्यक्तीची आधी गोळीबार (Firing) करत नंतर कोयत्याने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना आज (दि.२५) रोजी दुपारी घडली आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या (Shivajinagar Court) गेट क्रमांक ४ परिसरात ही घटना घडली असून, सहा जणांकडून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंदार किवळे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून, तो २०२५ मध्ये कात्रजमध्ये हत्या झालेल्या शुभम चव्हाण याच्या हत्या प्रकरणातील आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वीच तो जामीनावर सुटला होता, त्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पाठलाग करून क्रूर हल्ला
प्रत्यक्षदर्शी व न्यायालयाच्या आवारातील वकिलांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दोन दुचाकींवरून (अॅक्सेस आणि अॅक्टिव्हा) आलेल्या सहा ते सात हल्लेखोरांमधील एका संशयित (Suspected) आरोपीने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी हत्या करण्यात आलेला व्यक्ती शिवाजीनगर कोर्ट ते फॅमिली कोर्टाच्या दिशेने पळत सुटला. मात्र, हल्लेखोरांनी पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यावेळी किवळे घाबरून खाली बसल्यानंतरही हल्लेखोरांनी वार सुरूच ठेवले. यात त्याचे दोन्ही हात शरीरापासून वेगळे झाले. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
घटनास्थळी पिस्तूल आणि मॅगझीन जप्त
दरम्यान हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किवळेला पोलिसांनी (Police) तातडीने रिक्षातून रुग्णालयात हलवले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखा (क्राइम ब्रांच) आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल, काडतुसांनी भरलेली मॅगझीन आणि रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
न्यायालयाच्या गेटबाहेर नेहमीच नागरिकांची आणि वकिलांची मोठी वर्दळ असते. अशा सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी शस्त्रे घेऊन गुंड येतात आणि हत्या करून पसार होतात, यावरून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. “ही टिपिकल गुन्हेगारी असून, न्यायालयात तारखेसाठी आलेल्या साक्षीदारावर पाळत ठेवून त्याने साक्ष देऊ नये म्हणून त्याला संपवण्यात आले. गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलीस यंत्रणा कमी पडली आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय नेत्यांनी माध्यमांना दिली.




