नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मखमलाबाद परिसरातील (Makhmalabad Area) रामकृष्ण नगर व शांती नगर भागात भटक्या श्वानांना जेवण देणे आणि त्यावरून पेटलेल्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. मे २०२६ मध्ये घरावर (House) झालेल्या दगडफेकीनंतर सुरू झालेला हा संघर्ष आता ‘प्रतिगुन्हे’ दाखल होण्यापर्यंत आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये थेट एका मुक्या श्वानाला लाथेने मारहाण करून जखमी करण्याच्या घटनेपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात म्हसरूळ पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही गटांविरोधात तीन गुन्हे दाखल केले असून, या वादामागे श्वानप्रेम की शेजारील वर्चस्व व जुन्या तक्रारींचा राग, असा नवा प्रश्न परिसरात चर्चिला जात आहे.
पाेलिसांच्या माहितीनुसार, मुंबईत (Mumbai) नोकरीस असलेल्या आणि सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ करत नाशिकच्या मखमलाबाद येथील रामकृष्ण नगरात वृद्ध आई व लहान मुलीसह राहणाऱ्या डॉ. स्वप्नाली गणेशराव देशमुख यांनी घराबाहेरील भटक्या श्वानांना जेवण दिल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या रायकर कुटुंबाशी मे महिन्यात वाद झाला होता. इथे राहायचे असेल तर पैसे द्या, अशी मागणी करून त्रास व जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार डॉ. देशमुख यांनी पोलिसांत दिली होती. याचा राग धरून २१ मे २०२६ रोजी रात्री सुमारे पावणेनऊ वाजता घरावर दगडफेक झाल्याची तक्रार नोंदवली हाेती. यात गॅलरीच्या काचा व लोखंडी गेटचे नुकसान झाले होते, मात्र सुदैवाने गंभीर दुखापत झाली नव्हती.
दरम्यान, याच कालावधीत २३ मे २०२६ रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित डॉ. स्वप्नाली गणेशराव देशमुख यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले हाेते. फिर्यादी ज्योती रायकर (वय ४०, रा. शांतीनगर, मखमलाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ मे २०२६ रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पाळलेले व मोकाट श्वान सार्वजनिक रस्त्यावर बोलावून जेवण खाऊ घातले जात असून, ते जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांवर, लहान मुलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर धावून जात असल्याने जीवित व सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्याचा आरोप या गुन्ह्यात करण्यात आला हाेता. तर, आता मे महिन्यातील तणावानंतर आता २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९:४० वाजताच्या सुमारास शांतीनगर येथे पुन्हा नवा वाद उफाळला.
गल्लीतील रस्त्यावर (Road) एक काळ्या रंगाचा भटका कुत्रा उभा असताना कारण नसताना त्याच्या लघुशंकेच्या जागी लाथ मारून त्याला जखमी केल्याच्या घटनेप्रकरणी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात डॉ. स्वप्नाली गणेश देशमुख (वय ३२, रा, पार्थ कॉलनी, रामकृष्ण नगर) यांनी फिर्याद दिली असून, संशसित शंभू सोमनाथ रायकर (वय १९, रा. शांतीनगर, मखमलाबाद) याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१), (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार संजय गवारे तपास करत आहेत.




