Wednesday, November 25, 2026
HomeनाशिकNashik Dindori News : नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी रस्त्याचे काम धिम्या गतीने; वाहनचालक त्रस्त

Nashik Dindori News : नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी रस्त्याचे काम धिम्या गतीने; वाहनचालक त्रस्त

काँक्रिटीकरण मंजूर असताना डांबरीकरण सुरू

ओझे l विलास ढाकणे | Oze

नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाच्या कामाला शासनाकडून मंजुरी मिळालेली असताना, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी काही भागांत अचानक डांबरीकरण सुरू करण्यात येत असल्याने नागरिक (Citizen) व वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, पावसाळ्यात (Rain) मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी रस्ता प्र.मा.-०३ च्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कामाच्या (Work) ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकानुसार, सदर कामाची मंजूर किंमत सुमारे ७६ कोटी ५० लाख रुपये असून, काम पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२७ अशी नमूद करण्यात आली आहे. या कामाची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीकडे देण्यात आली आहे. मात्र, रस्त्याच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात खोदकाम करून रस्ता उखडण्यात आल्याने पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. विशेषतः दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागला.

आता काही ठिकाणी अचानक डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने, मंजूर काम काँक्रिटीकरणाचे असताना डांबरीकरण का करण्यात येत आहे, तसेच हे डांबरीकरण अंतिम स्वरूपाचे आहे की तात्पुरती उपाययोजना आहे, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम करताना वाहतुकीचे योग्य नियोजन, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि कामाचा स्पष्ट आराखडा नागरिकांना उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) रस्त्याच्या कामाचे स्वरूप, डांबरीकरण व काँक्रिटीकरणाबाबतची योजना स्पष्ट करावी, तसेच कामाला गती देऊन निर्धारित मुदतीत दर्जेदार काम पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. याबाबत बांधकाम अभियंता गौरव जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही ठिकाणी डांबरीकरण तर काही ठिकाणी काँक्रिटिकरण असल्याचे सांगत चढ उतार कमी करण्यासाठी खोदकाम केल्याचे सांगितले. मात्र सदर कामाच्या ठिकाणी लावलेल्या फलकावर रुंदीकरण व काँक्रिटीकरण असा स्पष्ट उल्लेख आहे.

ठळक मुद्दे

  • – काँक्रिटीकरण मंजूर, प्रत्यक्षात डांबरीकरण; नाशिक-दिंडोरी मार्गाच्या कामाबाबत संभ्रम.
    – संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालक त्रस्त.
    – पावसाळ्यात खोदकामाचा त्रास, आता डांबरीकरणामुळे नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सांगलीला जाणारा मद्यसाठा कोल्हापूरला पळवला! ट्रान्स्पोर्ट ब्रोकर,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कादवा म्हाळुंगी येथील नामांकित मद्यनिर्मिती कंपनीतून सांगलीला पाठवण्यात आलेला तब्बल १ कोटी ५२ लाख ११ हजार...