नाशिक | प्रतिनिधी
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाच्या काँक्रिटीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील पुलाच्या पीलरवर गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने शहर वाहतूक शाखेने मंगळवारपासून (दि. २४) शुक्रवार (दि. २७) पर्यंत या मार्गावर दररोज तीन टप्प्यांत वाहतूक बंद ठेवून ती पर्यायी मार्गाने वळविली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा ताण आल्याने आणि काही वाहनचालकांमध्ये माहितीअभावी संभ्रम निर्माण झाल्याने सातपूर परिसरात वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने प्रशासनाकडून रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील उजव्या बाजूच्या पुलावर अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने गर्डर बसविले जात आहेत. हे काम सुरू असताना पुलावरून वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक असल्याने वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान वाहतूक नियंत्रणाची अधिसूचना जारी केली आहे.
संपादकीय : २५ नोव्हेंबर २०२६ – नंदनवनात शांततेची चाहूल
अधिसूचनेनुसार मंगळवारी पहिल्या दिवशी ठरलेल्या वेळेत मुख्य मार्गावरील वाहतूक रोखून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. बंदोबस्तासाठी वाहतूक पोलिसांसह ट्रॅफिक वॉर्डनही तैनात होते. परंतु, अनेक वाहनचालकांना या बदलाची पूर्वकल्पना नसल्याने ऐनवेळी गोंधळ उडाला. पर्यायी मार्ग म्हणून देण्यात आलेल्या सातपूरमधील अशोकनगर, कार्बन नाका आणि बारदान फाटा या अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने काहीशी कोंडी झाली होती.
पर्यायी मार्ग व्यवस्था
त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणारी वाहतूक पिंपळगाव बहुला जकात नाका येथे प्रवेश बंद राहील. ही वाहने महिरावणी गिरणारे मार्गे नाशिककडे वळविण्यात आली आहेत. नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक पिंपळगाव बहुला बस स्टॅण्ड येथे प्रवेश बंद राहील. ही वाहने अमृत चौक येथून अशोकनगर कार्बन नाका बारदान फाटा मार्गे त्र्यंबकेश्वरकडे सोडली जात आहेत.
असे राहतील वाहतुकीतील बदल (२७ नोव्हेंबरपर्यंत)
दररोज वाहतूक बंद राहण्याची वेळ
पहाटेः ५.०० ते ६.००
दुपारीः १.०० ते २.००
दुपारीः ३.३० ते ४.३०




