नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कादवा म्हाळुंगी येथील नामांकित मद्यनिर्मिती कंपनीतून सांगलीला पाठवण्यात आलेला तब्बल १ कोटी ५२ लाख ११ हजार ४६ रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा परस्पर कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हा माल नेण्यासाठी वापरलेल्या माल ट्रकची मालक एक महिला असून, ट्रान्स्पोर्ट ब्रोकर आणि चालकाशी संगनमत करून हा ‘हाय-प्रोफाईल’ अपहार करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणूक (Fraud) व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय लक्ष्मण जगताप (वय ४५, रा. शिवशक्ती चौक, सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. ते काम करत असलेल्या कंपनीने कादवा म्हाळुंगी (ता. दिंडोरी) येथील परनॉड रिकार्ड इंडिया प्रा. लि. कंपनीतून ब्लेंडर्स प्राईड, १०० पायपर्स आणि रॉयल स्टॅग या ब्रँडच्या विदेशी मद्याचे १ हजार २५८ बॉक्स सांगली येथील एम्पायर स्ट्रीट येथे पाठवण्याचे नियोजन केले होते. या वाहतुकीसाठी नाशिकच्या शिवा रोडलाईन्सचा ट्रान्स्पोर्ट ब्रोकर विनय गुलशन मॅगो याच्यामार्फत चांदवड येथील संशयित ट्रकमालक ज्याेती दीपक अहिरे यांच्या मालकीचा (Onwer) २१ टन क्षमतेचा ट्रक (एम.एस. १५ एफ.व्ही. ९३००) भाडेतत्वावर घेण्यात आला होता.
१२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास कादवा म्हाळुंगी येथील कंपनीतून हा मद्यसाठा ट्रकमध्ये भरण्यात आला. चालक संशयित सागर कोतवाल याने हा ट्रक सांगली येथील दिलेल्या पत्त्यावर नेणे अपेक्षित होते. मात्र, संशयितांनी आपसांत संगनमत करून मालाचा अपहार करण्याचा कट रचला. चालकाने हा ट्रक सांगलीला न नेता १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी थेट पेठ वडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे नेऊन मालाची विल्हेवाट लावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांची कारवाई
प्रकार उघडकीस आल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा (रजि. नं. ४५७/२०२६) दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तपास करत आहेत. सध्या काेतवाल व आहिरे व मॅगाे पसार असून त्यांचा शाेध सुरु आहे. कोल्हापूरच्या पेठ वडगाव परिसरात हा दीड कोटींचा मद्यसाठा नेमका कोणाला विकला गेला किंवा कुठे लपवला आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
गाेवा की कर्नाटक?
नामांकित कंपन्यांचा कोट्यवधींचा माल नेण्यासाठी स्थानिक ब्रोकरमार्फत भाड्याने घेतलेल्या ट्रकचालक आणि मालकांकडूनच थेट मालाचा अपहार होत असल्याने सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. १,२५८ बॉक्स विदेशी मद्य कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे नेण्यात आले. कोल्हापूर सीमावर्ती भाग असल्याने हा माल गोवा किंवा कर्नाटक सीमेवर काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला गेला का, या दिशेने तपास सुरु आहे.




