नाशिक | भारत पगारे | Nashik
सातपूर औद्योगिक वसाहतीत (Satpur Industrial Estate) पहाटेच्या धुक्यासोबतच रोजच्यासारखी लगबग सुरू होती. २४ तासही सुरू असणाऱ्या कारखान्यांचे आवाज आणि कामगारांची ये-जा सुरू असतानाच २६ नोव्हेंबर २०२१ च्या सकाळी एका फोन कॉलने वातावरणातील शांतता भंग केली. सातपूरच्या कार्बन नाका परिसरातील रहिवाशी व भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष अमोल इघे यांना कंपनीतील एका कामगाराचा फोन आला. “भाऊ, जरा लवकर कंपनीत या, इथे गेटवर वाद सुरू आहे…”
इघे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तयारी केली आणि ते कंपनीकडे निघाले. कार्बन नाका ते सीएट कंपनी रस्त्यावरील म्हसोबा मंदिरासमोर इघे कारमधून उतरले. तेथे आधीपासूनच काही कामगार उभे होते. मात्र, त्याच गर्दीतून एक सावली पुढे आली – तो होता विनोद उर्फ विनायक बाळासाहेब बर्वे. बर्वेच्या डोळ्यात सूडाची भावना आणि हातात धारदार हत्यार होते. इघे काही समजण्याच्या आतच बर्वेने त्यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. धारदार शस्त्राचे वर्मी घाव बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात अमोल इघे जागेवरच कोसळले. अचानक झालेल्या या हल्ल्याने उपस्थित कामगार सैरभैर झाले, तर इघे यांचा जीव गेल्याचे खात्री पटताच बर्वे स्वतःच्या कारमध्ये बसून काही क्षणातच पसार झाला.
भल्या पहाटे घडलेल्या या निर्घृण हत्याकांडाची (Murder Case) बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. अमोल इघे हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी असल्याने शहरातील भाजपचे तिन्ही आमदार आणि शेकडो कार्यकर्त्यांनी घटनास्थळी व नंतर थेट सातपूर पोलीस ठाण्यासमोर (Satpur Police Sation) धाव घेतली. रस्त्यावर उतरून भाजप पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. “आरोपीला तातडीने अटक करा, नाहीतर आंदोलन मागे घेणार नाही,” असा पवित्रा आमदारांनी घेतला. पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत आदेश दिले. सातपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक सतिश घोटेकर यांनी तपास सुरि केला. बर्वेचा माग काढण्यासाठी मुंबई, पुणे, शिर्डी आणि मूळ गाव असलेल्या निफाडच्या दिशेने विशेष पोलिसांची पथके रवाना करण्यात आली.
सीसीटीव्ही (CCTV) फूटेज तपासले गेले, कार पळवून नेल्याचे दिसले, पण महामार्गावर बर्वेचा शोध घेणे म्हणजे वाळवंटात सुई शोधण्यासारखे होते. या थरारामागे होती औद्योगिक वसाहतीतील युनियनच्या वर्चस्वाची जुनी इर्षा. इघे आणि बर्वे एकाच कंपनीत नोकरीला होते. बर्वे गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने आणि कामगारांशी सतत वाद घालत असल्याने कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले होते. ऐन कोरोना काळात नोकरी गेल्याने त्याची उपासमार सुरू झाली होती. त्यावेळी इघे यांच्यासह युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला आर्थिक मदतही केली होती. परंतु, बर्वेच्या मनात युनियनचे पद मिळवण्याची इर्षा होती. कामगारांचा पाठिंबा मिळत नसल्याने त्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित वंचित कामगार संघटनेची स्थापना केली. मात्र, त्याच्या बैठकांना कामगारांनी पाठ फिरवली, तर इघे यांनी बोलवलेल्या बैठकांना कामगारांची उपस्थिती असायची.
याच अपमानाचा आणि पराभवाचा राग बर्वेच्या मनात धगधगत होता. त्यातूनच त्याने २६ नोव्हेंबरच्या पहाटे वाद उकरून काढून इघे यांचा काटा काढला. पसार झालेला बर्वे पोलिसांना चकवा देत मुंबईच्या दिशेने पळत हाेता. वाटेत ठाण्याची खाडी लागताच त्याने रक्ताने माखलेले गुन्ह्यातील हत्यार खाडीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एक तरी चूक करतोच. मुंबई, पुणे व शिर्डीला गेलेली पथके रिकाम्या हाताने परतीच्या मार्गावर असतानाच नाशिक पोलीस ठाण्यातील तांत्रिक तपास पथकाला धागा सापडला. बर्वे याने ठाण्यातील एका मॉलमध्ये प्रवेश केला होता. पळून जात असताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी किंवा कपडे बदलण्यासाठी तो मॉलमध्ये टी-शर्ट खरेदी करत होता. खरेदी पूर्ण झाल्यानंतर त्याने रोख रकमेऐवजी स्वतःच्या एटीएम/डेबिट कार्डनेस्वाइप करून बिल अदा केले. कार्ड स्वाइप होताच बँक सिस्टीममधून मेसेज ट्रिगर झाला आणि तांत्रिक पथकाला ठाण्यातील त्या मॉलचे अचूक लोकेशन मिळाले.
महामार्गावर थरारक पाठलाग अन् मुसक्या आवळल्या
घोटेकर यांनी विलंब न लावता, मुंबईहून (Mumbai) परतीच्या मार्गावर असलेल्या पोलीस पथकाला मॉलच्या लोकेशनवर पोहोचण्याचे आदेश दिले. पोलिसांनी मॉलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि बर्वेच्या कारचा पाठलाग सुरू केला. आपला माग काढला गेल्याचे बर्वेच्या लक्षात येताच त्याने कारचा वेग वाढवला. महामार्गावर गाड्यांचा थरारक पाठलाग सुरू झाला. अखेर, एका वळणावर नाशिक पोलिसांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने आपली कार बर्वेच्या कारला आडवी लावली. पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद होताच पोलिसांनी बर्वेवर झडप घातली आणि हत्येनंतर अवघ्या २४ तासांच्या आत त्याच्या मुसक्या आवळल्या.
खाडीतून हत्यार जप्त
अटक केल्यानंतर पोलिसांनी (Police) आरोपी बर्वेच्या सांगण्यावरून ठाण्याच्या खाडीतून अत्यंत शिताफीने हत्येसाठी वापरलेले ते धारदार हत्यार शोधून जप्त केले. रस्त्यावरील सीसीटीव्ही फूटेज, मॉल मधील डिजिटल ट्रान्झॅक्शनचा पुरावा (कार्ड स्वाइपिंग) आणि जप्त केलेले हत्यार यांमुळे पोलिसांची केस भक्कम झाली. गेल्या पाच वर्षांपासून बर्वे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गजाआड आहे. जिल्हा सत्र न्यायालयापासून मुंबई उच्च न्यायालयापर्यंत त्याचे सर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. पोलिसांनी न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले असून, एका तांत्रिक पुराव्यामुळे अवघ्या २४ तासांत उघडकीस आलेला हा थरारक खटला आता न्यायालयात अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.




