कानपुर । Kanpur
कोट्यवधींची संपत्ती, आलिशान फ्लॅट अन् अलिशान राहणीमान… पण, या गर्द श्रीमंतीच्या मुखवट्यामागे दडला होता एक भयानक आणि रक्तरंजित कौटुंबिक कट! उत्तर प्रदेशातील कानपूरमधील प्रसिद्ध औषध व्यावसायिक विनीत मिनोचा (६३) यांच्या घरात ५ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या क्रूर हत्येने संपूर्ण देश सुन्न झाला आहे.
शरीरावर तब्बल २६ हून अधिक चाकूचे वार करून झालेल्या या हत्येचा पोलिसांनी अखेर छडा लावला असून, यामागे दुसरं कोणी नसून स्वतःची सूनच सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. सासऱ्याच्या अतिनियंत्रणाला, खर्चावरील कडक निर्बंधांना आणि खासगी आयुष्यातील हस्तक्षेपाला कंटाळून सुनेने ६ लाख रुपयांची सुपारी देऊन सासऱ्याचा काटा काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय सून शालू मिनोचा हिला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विनीत मिनोचा हे अत्यंत श्रीमंत व्यावसायिक होते. मात्र, घरातील प्रत्येक पैशावर आणि खर्चावर त्यांचे कडक नियंत्रण होते. घरात मुलाला आणि सुनेला अगदी मोजकेच पैसे दिले जायचे; किंबहुना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांना पगार दिला जायचा. घरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, ज्यामुळे सुनेला कोणतीही प्रायव्हेसी मिळत नव्हती. पार्ट्या करणे, फिरणे यावर कडक बंधने होती. अत्यंत श्रीमंत कुटुंबात राहूनही सततच्या या हस्तक्षेपाला आणि अपुऱ्या पैशांना कंटाळून सून शालू हिच्या मनात सासऱ्याबद्दल प्रचंड राग निर्माण झाला होता.
सासऱ्याचा कायमचा काटा काढण्यासाठी शालूने घरातील नोकर विशाल गौतम याला ६ लाख रुपयांची सुपारी दिली. हत्येनंतर नातेवाइकांसमोर ढसाढसा रडून शालूने निष्पाप असण्याचे नाटक केले. मात्र, पोलिसांनी जेव्हा तांत्रिक तपास सुरू केला, तेव्हा तिच्या पापण्यांमागील क्रूरता उघड झाली. पोलिसांना तपासात आढळले की, केवळ २१ दिवसांत शालू, तिचा पती सुब्रत आणि नोकर विशाल यांच्यात तब्बल ३३० कॉल्स झाले होते. हत्येच्या रात्रीही शालू व्हॉट्सॲपद्वारे विशालच्या संपर्कात होती.
या संपूर्ण हत्याकांडात मृत विनीत यांच्या मुलाची म्हणजेच सुब्रतची भूमिकाही अत्यंत संशयास्पद मानली जात आहे. हत्या घडत असताना आणि पत्नीचा त्यात सहभाग असतानाही तो गप्प राहिला. पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता, त्याने नोकर विशालची ओळख पटवण्यासही स्पष्ट नकार दिला. सुब्रतच्या या मौनामागे मोठे गूढ दडले असल्याचा पोलिसांना संशय आहे. या हत्येच्या कटामध्ये पती सुब्रतचा प्रत्यक्ष सहभाग कितपत होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. सध्या सुनेला गजाआड करण्यात आले असून, हे प्रकरण कौटुंबिक तणाव आणि पैशांच्या अति-नियंत्रणातून घडलेल्या एका भयानक गुन्ह्याचे ज्वलंत उदाहरण ठरले आहे.




