नाशिक | भारत पगारे | Nashik
तळेगाव (Talegaon) रेल्वे स्थानकाचा एकमेव आणि एकाकी फलाट. ७ मे २०१४ चा तो दिवस होता, सकाळचे अकरा वाजले होते. स्थानकावर अचानक एक लाल रंगाची ट्रॅव्हलर बॅग संशयास्पदरित्या बेवारस अवस्थेत पडून असल्याचे आढळून आले. रेल्वे पोलिसांनी ती बॅग उघडून पाहिली, तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला. आत १५ ते १७ वयोगटातील एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कोंबलेला होता. प्राथमिक पाहणीतच तिचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र शरीरावर इतर कोणतीही बाह्य जखम वा शस्त्राचे वळ नव्हते. सगळ्यात मोठे गुढ म्हणजे, मृत मुलीची कोणतीही ओळख पटत नव्हती आणि रेल्वे फलाटावर सुरक्षेसाठी एकही सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नव्हता. अशा अत्यंत क्लिष्ट आणि अंधाऱ्या गुन्ह्याचा तपास जेव्हा पुणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या गुन्हेशाखेचे तत्कालीन सहायक निरीक्षक रामदास शेळके यांच्याकडे सोपवण्यात आला, तेव्हा त्यांनी मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या बळावर अवघ्या २४ तासांत क्राईम थ्रिलरसारखा या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
तपासाची कोणतीही दिशा समोर नसताना शेळके यांनी बारकाईने मृतदेहाची (Dead Body) पाहणी करण्याचे ठरवले. महिला पोलीस अंमलदाराच्या उपस्थितीत मृतदेहाचे कपडे बदलत असताना, मृत मुलीच्या अंतवस्त्राची तपासणी करताना जमिनीवर काहीतरी पडल्याचा हलका आवाज झाला. तो एक महत्त्वाचा आणि सूक्ष्म पुरावा होता—एक सीमकार्ड! त्यावर केवळ १६ अंकी क्रमांक लिहिलेला होता, इतर कोणतीही माहिती किंवा मोबाईल नंबर त्यावर नव्हता. ते सीमकार्ड स्वतःच्या किंवा अन्य मोबाईलमध्ये टाकून तपास करणे धोक्याचे ठरले असते, त्यामुळे शेळके यांनी कोणतीही घाई न करता थेट मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून तांत्रिक माहिती मागवली.
काही तासांच्या पाठपुराव्यानंतर कंपनीकडून माहिती मिळाली की, ते सीमकार्ड नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एका युवकाकडे वापरले जात होते. शेळके यांनी नालासोपारा गाठले. त्या युवकाशी संपर्क साधून खात्री केली असता, एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. ती मृत मुलगी म्हणजेच राणी मूळची वडाळ्याची होती आणि मुंबईतीलच चार तरुणांसोबत नालासोपाऱ्यात एका फ्लॅटमध्ये राहत होती. हे चौघे तरुण तिच्यावर सतत पाळत ठेवून असायचे आणि तिला अमानुष मारहाण करत होते. राणीने एका स्थानिक युवकाच्या मदतीने त्यांच्यापासून लपून हे सीमकार्ड मिळवले होते आणि ती त्याच्याशी छुप्या पद्धतीने बोलत असे. हाच एकमेव धागा पकडून पोलिसांनी या रॅकेटच्या मुसक्या आवळण्याचा व्यूह रचला. संशयित ज्या खानावळीत नियमित जेवायला जात असत, तिथे पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. मृत राणीच्या ओळखीच्या युवकाकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित रात्री परतणार असल्याची कुणकुण लागली. शेळके आणि त्यांच्या पथकाने संशयित राहत असलेल्या अपार्टमेंट गाठली.
या लोकांच्या फ्लॅटची चावी नेहमी शेजाऱ्यांकडे ठेवली जात असे, ही महत्त्वाची बाब हेरून पोलिसांनी शेजाऱ्यांच्या घरात आपले दोन अंमलदार लपवून ठेवले, तर पार्किंगमध्ये साध्या वेशात पथक तैनात केले. काही वेळातच संशयित चौघे फ्लॅटवर आले. जसा त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला, तशी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी एकाच झटक्यात चौघांनाही गजाआड केले. पोलिसांनी त्या फ्लॅटची झडती घेतली असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जमिनीवर जागोजागी केस पडलेले होते; जे राणीला मारहाण करत असताना झटापटीत तिने ओढलेले किंवा तिचे उपटलेले केस असावेत, जो एक भक्कम फॉरेन्सिक पुरावा ठरला. एका खोलीत वेगवेगळ्या बँकांची तब्बल डझनभर एटीएम कार्ड्स सापडली. हे साधेसुधे खुनी नसून, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि मुंबईसह विविध राज्यांत हातचलाखीने एटीएम कार्ड्स लंपास करून लोकांची बँक खाती रिकामी करणारे एक कुख्यात आंतरराज्यीय आर्थिक गुन्हेगारी रॅकेट होते. वडाळ्याच्या झोपडपट्टीतून त्यांनी नालासोपाऱ्यात बस्तान हलवले होते आणि राणी या काळ्या धंद्याची साक्षीदार बनल्यामुळे तिने बंड पुकारताच ते तिच्या जिवावर उठले होते.
राणी या गुन्हेगारी कृत्यांच्या जंजाळाला आणि अमानुष अत्याचारांना पुरती कंटाळली होती. सुरुवातीला खाण्यापिण्याच्या चंगळीमुळे तिला काही वाटले नाही, पण नंतर चौघेही तिच्यावर अत्याचार करू लागले. कंटाळून ती घरवापसीची भाषा करू लागली आणि त्यांच्या गुन्ह्यांची पोलखोल करण्याची धमकी देऊ लागली. अखेर ७ मेच्या दोन दिवस आधी चौघांनी तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका दुकानातून नवी ट्रॅव्हलर बॅग विकत घेतली. तपासादरम्यान रामदास शेळके यांनी पुराव्यांची साखळी तयार केली. ज्या दुकानातून बॅग विकत घेतली, तिथले सीसीटीव्ही फूटेज आणि खरेदीची पावती पोलिसांच्या हाती लागली. संशयितांच्या फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही नसला तरी, पार्किंगमधून बाहेर पडताना रस्त्यावरील एका टॉवरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघेजण बॅग ओढत नेताना कैद झाले होते. दादरच्या ज्या हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले, तिथले सीसीटीव्ही आणि जेवणाचे बिल जप्त करण्यात आले. तसेच मुंबई-पुणे महामार्गावरील टोलनाक्यावर ही टॅक्सी सीसीटीव्हीत कैद झाल्याने, टॅक्सीचालकाचा शोध घेऊन त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला.
अखेर न्यायाची पायरी
रामदास शेळके यांनी या गुन्ह्यात तब्बल दोन हजार पानांचे तांत्रिक दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. पैरवी अंमलदार दत्तात्रय मोरे यांच्या सहकार्याने चाललेल्या या खटल्यात पुणे सत्र न्यायालयाने चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी या निर्णयाविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु पोलिसांच्या भक्कम पुराव्यांपपुढे त्यांचे कोणतेही युक्तिवाद टिकले नाहीत आणि सत्र न्यायालयाची शिक्षा कायम ठेवण्यात आली. एका निर्जन रेल्वे फलाटावर बेवारस मिळालेल्या बॅगेपासून आणि एका छोट्याशा सीमकार्डपासून सुरू झालेला हा तपास एका गुन्हेगारी साम्राज्याचा पर्दाफाश करून न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरला.




