अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात घडणार्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी आता प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर स्वतंत्र विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी याबाबत आदेश दिले असून, प्रत्येक पथकात एका पोलीस अधिकार्यासह तीन ते चार अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, पोक्सो, दरोडा आदी गंभीर गुन्ह्यांचा तपास या पथकामार्फत केला जाणार आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हा घडल्यानंतर त्यातील संशयित आरोपींचा शोध घेणे, त्यांना अटक करणे, गुन्ह्यामागील उद्देशाचा शोध घेणे तसेच तपासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या इतर बाबींची माहिती संकलित करण्याची जबाबदारी या विशेष तपास पथकावर राहणार आहे. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस ठाणे स्तरावर स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हे शोध पथक अर्थात डिबी कार्यरत आहे. गंभीर गुन्ह्यांसह घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, सोनसाखळी चोरी आदी गुन्ह्यांचा शोध घेण्याचे काम प्रामुख्याने या पथकामार्फत केले जाते.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांची संख्या आणि स्वरूप लक्षात घेऊन डिबी पथकाची रचना केली जाते. या पथकात साधारणपणे एका अधिकार्यासह आठ ते दहा किंवा त्यापेक्षा अधिक अंमलदारांचा समावेश असतो. मात्र, गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पथक असावे, अशा सूचना पोलीस महासंचालक स्तरावरून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अधीक्षक सुदर्शन यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डिबी पथकासोबतच गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत झाली आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद दररोजच होत असते. अशा गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास केला जातो. गंभीर गुन्हा घडल्यानंतर एलसीबीकडून संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न केले जातात. आता प्रत्येक पोलीस ठाण्यातच विशेष तपास पथक कार्यरत झाल्यामुळे गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी ठाणे पातळीवर अतिरिक्त यंत्रणा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून होणार्या तपासाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.




