
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या मोहिमेत पोलिसांनी हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून फिरत असलेल्या चार सराईत गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळवले आहे. त्यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (6 सप्टेंबर) सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, हद्दपार आदेश असूनही काही गुन्हेगार एमआयडीसी हद्दीत फिरत आहेत. याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित गुन्हेगार पळण्याचा प्रयत्न करत होते; मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले. यामध्ये अभिषेक उर्फ भोर्या अरविंद भिंगारदिवे (वय 20), आशिष अंतोन पाटोळे (वय 22, दोघे रा. नागापूर, अहिल्यानगर), विशाल भाऊसाहेब पाटोळे (वय 24, रा. गणेश चौक, बोल्हेगाव, अहिल्यानगर) व अजय उर्फ मठ्ठस सोमनाथ गुळवे (वय 25, रा. लामखेडे पंप, निंबळक बायपास, एमआयडीसी, अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. वरील चारही गुन्हेगार हद्दपार आदेश असतानाही एमआयडीसी हद्दीत फिरल्याने भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व सराईत गुन्हेगार असून एमआयडीसी, तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यांसह पुणे जिल्ह्यात देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई सहायक निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखली अंमलदार राकेश खेडकर, राजु सुद्रीक, सचिन आडबल, संदीप पवार, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे व ज्ञानेश्वर आघाव यांच्या पथकाने केली आहे.




