अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी तोफखाना पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोठी कारवाई करत भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) कलम 111 (संघटित गुन्हेगारी) लागू केले आहे. खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, पोक्सो, जबरी चोरी, अपहरण, घरफोडी, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या आरोपींवर ही वाढीव कारवाई करण्यात आली आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 जून रोजी एका तरुणाला तीन ते चारजणांनी लाकडी दांडके, कमरेचा बेल्ट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी यश शिरसाठ, चेतन सरोदे, विशाल पाटोळे (सर्व रा. बोल्हेगाव) आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीतील आरोपींवर तोफखाना, कोतवाली, एमआयडीसी आणि सुपा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत, बलात्कार व पोक्सो, मोटारसायकल चोरी, अपहरण, शिवीगाळ आणि दमदाटी यांसारखे गंभीर स्वरूपाचे एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याचप्रमाणे, 29 मे 2026 रोजी नीलक्रांती चौक परिसरात एका महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याच्या प्रकरणात रोहित अल्हाट आणि गौरव अल्हाट (रा. नीलक्रांती चौक, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींवर तोफखाना, नगर तालुका आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, बलात्कार व पोक्सो, विनयभंग, जबरी चोरी, घरफोडी तसेच मावा तयार करून विक्री करणे अशा गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही टोळ्यांतील आरोपींवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
मात्र, त्यानंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट त्यांनी शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे सातत्याने सुरूच ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर कठोर आणि परिणामकारक कारवाई करण्यासाठी संबंधित गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेतील कलम 111 लागू करण्याचा प्रस्ताव तोफखाना पोलिसांनी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर अपर पोलीस अधीक्षकांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लागू करण्यास मंजुरी दिली. या कारवाईमुळे संबंधित गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड होऊन शहरातील त्यांची दहशत कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.




