अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके होरपळून निघत असून राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी व नेवासा या पाच तालुक्यांत अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातही राहुरी तालुक्यात सरासरीच्या अवघा 36 मिलीमीटर पाऊस झाल्याने पिके करपली आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच नगरकर ऑक्टोबर हिटचा अनुभव घेत असून, ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात 108 पाण्याचे टँकर सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
परतीचा पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर रूप धारण करेल. जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असला तरी त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) नगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा जून महिना कोरडा गेल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या.
जुलै महिन्यात 161 मिलीमीटर (166 टक्के) दमदार पाऊस झाल्याने पेरण्या पूर्ण झाल्या, तसेच भंडारदरा, निळवंडे व आढळा ही धरणे ओव्हरफ्लो झाली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पिकांच्या वाढीच्या काळातच पावसाने दडी मारल्याने मका, सोयाबीन, मूग आणि उडीद ही पिके करपून गेली आहेत. चारा टंचाईमुळे चार्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सप्टेंबर महिन्यात सरासरी 145 मिलीमीटर पावसाची गरज असताना पहिला आठवडा कोरडा गेल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
ऐन पावसाळ्यात 108 टँकर
जिल्ह्यात सध्या 108 टँकरद्वारे 2 लाख 8 हजार नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. यात सर्वाधिक 50 टँकर एकट्या पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. याशिवाय नगर तालुक्यात 19, शेवगाव 14, कर्जत 11, संगमनेर 6, पारनेर 4, जामखेड 3 आणि नेवासा तालुक्यात 1 टँकर सुरू आहे.




