Monday, November 23, 2026
HomeनगरAhilyanagar : मिळकतीच्या मालकी हक्काची दुहेरी पद्धत बंद

Ahilyanagar : मिळकतीच्या मालकी हक्काची दुहेरी पद्धत बंद

नगरमध्ये अंमलबजावणी सुरू || कोट्यवधींचे मालमत्ता व्यवहार अडचणीत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शासनाच्या आदेशानुसार भूमापन हद्दीतील बिनशेती वापराच्या मिळकतीच्या मालकी हक्काची दुहेरी पद्धत बंद करण्यात आली आहे. नगर शहर भूमापन हद्दीत असल्याचे कारण देत केडगाव परिसरातील काही 7/12 उतारे अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांचे खरेदी-विक्री व्यवहार, बँक कर्ज, तारण, बोजा नोंदणी व खरेदीखत नोंदणीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. सर्व दस्तऐवजी प्रक्रिया पूर्ण करून अंतिम टप्प्यावर पोहोचलेले व्यवहार अचानक अडकल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे अंतिम अभिलेखीय कार्यवाही पूर्ण होईपर्यंत संक्रमण कालावधीत 7/12 उतारे तात्पुरत्या स्वरूपात सुरू ठेवावेत, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली जात आहे.

- Advertisement -

भूमी अभिलेख विभागाच्या निर्देशानुसार ही कार्यवाही झाली असली, तरी कोणतीही पूर्वसूचना अथवा जाहीर नोटीस न देता 19 ऑगस्टच्या पत्रानंतर लगेच 20 ऑगस्ट रोजी 7/12 उतारे बंद करण्यात आले. यामुळे आधीपासून प्रक्रियेत असलेल्या व्यवहारांना आवश्यक संक्रमणकालीन अवधी किंवा पर्यायी अभिलेख उपलब्ध झाला नाही. परिणामी, साठेखत, मुद्रांक शुल्क, बँक कर्ज मंजुरी, कर्ज वितरण व मालमत्ता मूल्यांकन यांसारख्या अंतिम टप्प्यातील बाबी रखडल्या आहेत. 7/12 उतारे बंद झाल्याने केवळ नागरिकांचे व्यवहार थांबलेले नाहीत, तर शासनाचा महसूलही तुटला आहे. खरेदीखत नोंदणी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व फेरफार प्रक्रिया थांबल्याने शासकीय तिजोरीत येणारा महसूल विलंबित होत आहे.

महसुली व भूमी अभिलेखमधील विसंगती ऐरणीवर
या निर्णयामुळे महसूल आणि भूमी अभिलेख विभागाकडील नोंदींमधील विसंगती, क्षेत्रफळातील तफावत आणि अद्ययावत नसलेले अभिलेख यांसारखे प्रशासकीय प्रश्न समोर आले आहेत. महसुली अभिलेख, नगर भूमापन अभिलेख, मिळकत पत्रिका, फेरफार नोंदी आणि महापालिका किंवा नगररचना विभागाच्या दफ्तरात तफावत असल्यास त्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. विविध विभागांचे दफ्तर सुसंगत करण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असली, तरी त्याचा ताप आधीच अंतिम टप्प्यात आलेल्या व्यवहारांना होऊ नये, अशी मागणी व्यक्त होत आहे.

संक्रमण काळासाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज
अभिलेखांतील त्रुटी दूर करणे, मोजमाप, सीमांकन व दुरुस्ती ही टप्प्याटप्प्याने चालणारी दीर्घ प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आधीच अंतिम टप्प्यावर असलेल्या वैध व्यवहारांना अडवून न ठेवता प्रशासनाने संक्रमण कालावधीसाठी स्वतंत्र व तात्पुरती व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

गोकुळ

‘गोकुळ’च्या अध्यादेशासाठी मोजले ८० लाख! राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी...

0
मुंबई | प्रतिनिधीकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात 'गोकुळ' वर पाच शासकीय संचालक नियुक्त करणाऱ्या अध्यादेशाच्या न्यायालयीन युक्तिवादासाठी राज्य सरकारने न्यायालयात तब्बल ८० लाख...