अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रथमच गंभीर गुन्ह्यांतील सराईत आरोपींची ओळख परेड आयोजित करण्यात आली. पोलीस मुख्यालयात शनिवारी झालेल्या या उपक्रमात नगर शहर व दक्षिण विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सुमारे 250 आरोपींना हजर करण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाची कारवाई झाल्याने गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या विशेष परेडला अधीक्षक सुदर्शन यांनी गुन्हेगारांना ताकीद दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अहिल्यानगर शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, ग्रामीण उपअधीक्षक शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलीस ठाण्याचे प्रभारी उपस्थित होते. या परेडमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्रांचा वापर, गंभीर दुखापत, गावठी कट्टे, दहशत माजविणे तसेच शरीराविरुद्धच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा समावेश होता. प्रत्येक आरोपीकडून आवश्यक माहिती घेण्यात आली, त्यांचे इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले आणि त्यांच्या गुन्हेगारी हालचालींचा सखोल आढावा घेण्यात आला. परेडला अनुपस्थित राहिलेल्या आरोपींना पुढील परेडमध्ये अनिवार्यपणे हजर करण्याचे आदेश सर्व संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
अलीकडच्या काळात काही गुन्हेगार सोशल मीडियावर 302 सारखे गुन्हेगारी कोड वापरून स्टेटस ठेवणे, स्वतःला डॉन किंवा राऊडी म्हणून सादर करणे, पिस्तूल किंवा लायटर हातात घेऊन फोटो-व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यावर पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, अशा प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटवर सायबर पोलिसांची बारकाईने नजर आहे. स्टेटस, पोस्ट, रील किंवा कमेंटद्वारे दहशत पसरविण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल.
जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी अशा प्रकारच्या ओळख परेड आणि समुपदेशन मोहिमा सातत्याने राबविल्या जाणार आहेत. गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, कायदा हातात घेणार्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा निर्धार पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी व्यक्त केला.
अन्यथा थेट तुरुंगाचा रस्ता
परेडदरम्यान पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आरोपींशी थेट संवाद साधत स्पष्ट शब्दांत इशारा दिला. गुन्हेगारीची वाट कायमची सोडा, कायद्याचा सन्मान करा आणि शांततेने जीवन जगा. पुन्हा कोणत्याही गुन्ह्यात सहभागी झाल्यास किंवा नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केल्यास कोणतीही द्या दाखवली जाणार नाही. संबंधितांवर कठोर कायदेशीर आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.




