एकरुखे |वार्ताहर| Ekrukhe
कृषी विभागाने शेतकर्यांना स्वतःच्या शेतातील पीक पाहणी करण्यासाठी अॅप उपलब्ध करून दिले असले तरी, त्या अॅपवर ओटीपी येत नसल्याने शेतकर्यांना त्याचा वापर करता येत नाही. याचाच फायदा घेत पीक पाहणीसाठी महसूल खात्याकडून नेमलेल्या लोकांकडून शेतकर्यांची खुलेआम लूट सुरू आहे.
शासनाने ई-पीक पाहणी अॅप शेतकर्यांसाठी सुरू केले आहे, जेणेकरून शेतकरी स्वतःच मोबाईलवरून पीक पाहणी करू शकेल. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या अॅपवर ओटीपी येत नसल्याने शेतकर्यांना पीक पाहणी करता येत नाहीे. याच अडचणीमुळे महसूल विभागाने पीक पाहणीसाठी नेमलेल्या खासगी व्यक्ती शेतकर्यांकडे पैशाची मागणी करत आहेत. एका शेतकर्याच्या पीक पाहणीसाठी प्रत्येक गट नंबरसाठी 50 ते 100 रुपये घेतले जात आहेत. काहीजण 100 रुपये घेतात तर काहीजण 50 रुपये घेतात.
एकीकडे शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना, दुसरीकडे शासकीय यंत्रणेतील त्रुटीमुळे त्यांना नाहक पैसा मोजावा लागत आहे. यासंदर्भात तलाठ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, पीक पाहणीसाठी शेतकर्यांकडून पैसे घेता येत नाहीत, हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे महसूल व कृषी खात्याच्या अधिकार्यांनी याकडे तातडीने लक्ष घालावे. अॅपच्या ओटीपीची तांत्रिक अडचण दूर करावी आणि शेतकर्यांकडून पैसे उकळणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गणेश परिसरातील एकरुखे, रांजणगाव खुर्द गावांमधील शेतकर्यांनी केली आहे.




