Thursday, October 22, 2026
Homeक्राईमNashik Crime News: दहशतवाद्यांशी संबंध असल्याची भीती दाखवून ७१ लाखांचा गंडा; अटकेची...

Nashik Crime News: दहशतवाद्यांशी संबंध असल्याची भीती दाखवून ७१ लाखांचा गंडा; अटकेची धमकी देत सायबर भामट्यांनी केली आर्थिक फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी
काश्मीरमधील दहशतवादी प्रकरणाशी तुमचा संबंध असल्याचे सांगत, तुमच्या आधारकार्डचा बापर करून बँक खाते उघडण्यात आले असून त्यातून कोट्यवधी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणात अटक होईल, मालमत्ता जप्त केली जाईल, अशी भीती दाखवत सायबर भामट्यांनी एका व्यक्तीला तब्बल ७१ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.

या प्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर गुन्हेगारांनी भीती आणि मानसिक दबावाचा वापर करून आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. २८ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत फिर्यादी यांच्याशी मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. काश्मीरमधील जेके९५२७ या प्रकरणात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडे फिर्यादी यांचे आधारकार्ड आढळल्याचा दावा करण्यात आला.

- Advertisement -

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शस्त्रपुरवठ्याची साखळी उघड; ‘डेड लेटर बॉक्स’चा वापर, काय आहे नेमकं डेड लेटर बॉक्स?

या आधारकार्डच्या आधारे एचडीएफसी बँकेत फिर्यादी यांच्या नावाने खाते उघडून तब्बल ७० कोटी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कथित प्रकरणामुळे फिर्यादी अडचणीत येऊ शकतात, त्यांना अटक होऊ शकते आणि त्यांची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते, अशी भीती दाखवण्यात आली. अचानक झालेल्या या आरोपामुळे फिर्यादी यांच्यावर मानसिक दबाव निर्माण झाला. त्यानंतर त्यांच्या पैशांबाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले.

तक्रारीनुसार, संशयितांनी फिर्यादी यांना विविध बँक खात्यांवर एकूण ७१ लाख रुपये भरण्यास भाग पाडले. या प्रक्रियेत व्हॉट्सअॅप आणि सिग्नल या ऍपचा वापर करून संपर्क साधण्यात आल्याचे नमूद आहे. या प्रकारानंतर नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास बरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे करीत आहेत.

भीतीचा वापर करून फसवणुकीचा नवा डाव
दहशतवाद, मनी लॉन्ड्रिंग, पोलिसांची कारवाई आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या गंभीर बाबींचा उल्लेख करून नागरिकांना घाबरविणे, हा सावबर फसवणुकीचा धोकादायक प्रकार आहे. सरकारी यंत्रणांचे नाव पुढे करून नागरिकांवर दबाव निर्माण केला जातो आणि चौकशीच्या बहाण्याने पैशांची मागणी केली जाते. अशा वेळी घाबरून कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून बैंक खात्यात पैसे जगा करू नयेत. संशयास्पद संपर्क आल्यास संबंधित यंत्रणेच्या अधिकृत क्रमांकावरून खातरजमा करावी आणि आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी संकेतस्थळावर तक्रार दाखल करावी असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या