दिल्ली । Delhi
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर फेंगल या चक्रीवादळात झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत किनारपट्टी भागात धडकणार आहे.
यंदाच्या मान्सूननंतर बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे हे दुसरे चक्रीवादळ आहे. दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक अशी सर्व खबरदारी घेतली जात आहे. फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक किनारी भागातील हवामानात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.
हे चक्रीवादळ देशाच्या पूर्वेकडील सागरी सीमेवर हे वादळ धडकणार असून, दूरपर्यंत त्याचे परिणाम दिसून येेणार आहेत. त्यामुळे देशातील ७ राज्यांना सतर्कतेचा इशारा आहे. मात्र महाराष्ट्रावर तुर्तास तरी या वादळाचा फारसा परिणाम होणार नाही. कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश या राज्यांना सतर्कतेचा इशारा आहे.
चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो एअरलाइन्सने चेन्नई विमानतळावरील सर्व उड्डाणं आणि लॅडींग तात्पुरते स्थगित केले आहेत. प्रवासी आणि वैमानिक-केबिन क्रू यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हवामानात सुधारणा झाल्यावर विमानसेवा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. कंपन्यांनी म्हटलंय की, आम्ही प्रवाशांना रीअल-टाइम अपडेटसाठी त्यांच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधण्यास सांगितलं आहे.
फेंगल या शब्दाचा अर्थ आहे उदासीन, हा अरेबिक भाषेतला शब्द आहे. चक्रीवादळाचे नाव ‘फेंगल’ सौदी अरेबियाने प्रस्तावित केले होते आणि त्याचे मूळ अरबी भाषेतून घेतले आहे. हे नाव भाषिक वारसा आणि सांस्कृतिक ओळख यांच्या मिश्रणाचे प्रतीक आहे, जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (UNESCAP) नामकरण पॅनेलमधील प्रादेशिक विविधतेवर जोर देतं.