नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट झाले असून गेल्या १५ वर्षांपासून या राज्यात असलेली तृणमूल काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे. २०१६ आणि २०२१ मध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अखेर सत्ता स्थापन केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला तब्बल २०६ जागा मिळाल्या. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १५ हजार १०५ मतांनी ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना एकूण ७३ हजार ९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८ हजार ८१२ मतांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप करत टिका केली आहे.
आम्ही निवडणूक हरलेलो नाही तर हरवले गेले आहे
आजपर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या, पण यंदाची बंगालसारखी झालेली निवडणूक मी कधीही पाहिली नव्हती. भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून गैरवापर केला. आमच्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त हेच व्हिलन आहेत. भाजपने जमेल तेवढ्या ताकदीचा वापर केला. एसआयआरच्या आडून बेईमानी केली. जवळपास ९० लाख मते एसआयआरच्या प्रक्रियेत गाळली गेली. आम्ही बंगालची निवडणूक हरलेलो नाही, आम्हाला हरवले गेले आहे, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.
मी ४० हजार मतांनी आघाडीवर असताना निकाल बदललाच कसा? असा प्रश्न विचारीत मतांची हेराफेरी करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून केल्याचा गंभीर आरोप ममतांनी केला. यावेळी आम्ही हरलो नाही आम्हाला हरवले गेले, असेही ममता म्हणाल्या.
इंडिया आघाडी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी
मतदार यादीतील सुधारणांच्या नावाखाली माझ्या लाखो समर्थकांची मते हेतुपुरस्सर वगळण्यात आली आणि मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान माझ्या प्रतिनिधींना धमक्या देऊन दहशत निर्माण करण्यात आली, असा दावा त्यांनी केला. तसेच संपूर्ण ‘इंडिया’ आघाडी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे आपण आता भाजपने केलेल्या या “मतांच्या लुटी” विरोधात गप्प बसणार नाही. या निवडणूक गैरप्रकाराला न्यायालयात आव्हान देणार आणि त्याविरुद्ध सर्वशक्तीनिशी लढा देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणुका झाल्या. तिथे भारतीय जनता पक्षाने लोकशाहीची हत्या करून सरकारे स्थापन केली. तसेच काम भाजपने बंगालमध्येही केले. एसआयआरच्या नावाखाली तब्बल ९० लाख मते वगळली. भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून लोकशाहीची हत्या केली, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांनी मला निवडणूक निकालानंतर फोन केले. भाजपविरोधातील लढ्यात तुमच्यासोबत आहोत, अशी त्यांनी ग्वाही दिली. निवडणुकीत पराभव जरी झालेला असला तरी भाजपविरोधात माझा लढा अधिक तीव्र करेन, असे सांगत आगामी काळातील इरादे ममतांनी स्पष्ट केले.
भाजपने १०० जागा चोरल्या
आमची लढाई भाजपाशी नव्हती, तर निवडणूक आयोगाशी होती. मी माझ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही. २००४ पासून मी असे अत्याचार पाहिले नाहीत. निवडणूक आयोग हाच मुख्य खलनायक आहे. SIR मधून ९० लाख मते काढून टाकण्यात आली. भाजपाने १०० जागा चोरल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आम्हाला हरवण्यासाठी हातमिळवणी केली. भाजपाने आम्हाला हरवण्यासाठी शक्य असलेले प्रत्येक डावपेच वापरले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला.
माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्धवत नाही
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार? असा प्रश्न विचारला असता ममता बॅनर्जी यांनी ठामपणे सांगितले की, “माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण आम्ही ही निवडणूक हरलेलो नाही. भविष्यातील रणनीतीबाबत पक्षाच्या सदस्यांशी चर्चा केली जाईल. भाजपकडून होणारे अत्याचार मी आता यापुढे कदापि सहन करणार नाही. मी पुन्हा रस्त्यावर उतरून संघर्ष करेन, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.





