मुंबई | Mumbai
मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर (Kabutar Khana) कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार मुंबई शहरात कबूतर खाणे बंद करण्यात आलेले आहेत. मात्र मुंबईत कबूतरखाने सुरू राहावेत, यासाठी जैन समाज चांगलाच आक्रमक झाले होता. यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह जैन समाजाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यात दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी (CM) म्हटले होते.
पंरतु, त्यांनतर आज (बुधवारी) सकाळी दादरच्या कबुतरखान्यावरील (Dadar Kabutar Khana) ताडपत्री हटवण्यासाठी जैन समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले. याशिवाय अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून बांधलेली ताडपत्री काढली. तसेच कबुतरखान्यावर बांधण्यात आलेले बांबू देखील महिलांकडून हटवण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. तसेच काही आंदोलकांनी तिथे कबुतरांसाठी धान्य टाकले. त्यामुळे पुन्हा एकदा तिथे कबुतरे जमण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, यावेळी काही आंदोलकांनी (Protesters) बीएमसीच्या कारवाईमुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, असे म्हटले. तर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कबुतरखान्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. यामुळे स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, जैन समाजाने याला धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा बनवत बीएमसीच्या कारवाईला विरोध केला”, असे सांगितले.
कबुतरांमुळे मानवांमध्ये होतात धोकादायक आजार
कबुतरांच्या विष्ठेद्वारे (बीट), पिसे, शरीरातून बाहेर पडणाऱ्या धुळीच्या कणांद्वारे किंवा परजीवींद्वारे मानवांमध्ये धोकादायक आजार पसरतात. त्यांना झुनोटिक आजार म्हणतात. यामध्ये क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाज्मोसिस सायटाकोसिस किंवा पोपट ताप, साल्मोनेलोसिस, एव्हीयन माइट इन्फेस्टेशन आणि टॉक्सोप्लाज्मोसिस यासारखे आजार समाविष्ट आहेत.




