अलीकडच्या काळात पावसाळा आणि अनेक ठिकाणी पावसाळी पर्यटनावर बंदी हातात हात घालूनच येतात. हरिश्चंद्रगड, रतनगड, सांदणदरी, नाशिकमधील हरिहरगड अशा काही ठिकाणी वन्यजीव विभागाने नुकतीच पर्यटक प्रवेशबंदी केली. दिवसेंदिवस पावसाळी पर्यटनात वाढ होत आहे. पावसाळ्यात धबधबे, निसर्गरम्य स्थळे माणसांना खुणावतात. माणसे पर्यटनासाठी बाहेर पडतात. पडायलाही हवे. असे हंगामी पर्यटनही तात्पुरते रोजगारपूरक ठरते. छोट्या छोट्या ठिकाणीदेखील चार पैसे गाठीला करण्याची संधी स्थानिकांना उपलब्ध होते. अकुशल व्यक्तींच्या हातालासुद्धा काही ना काही काम मिळते. पण पर्यटकांचा अतिउत्साह त्यांची संधी हिरावून घेतो. पर्यटनस्थळी पयर्टक हुल्लडबाजी करतात.
स्थानिकांच्या मते उच्छाद मांडतात. सेल्फीसाठी जीव धोक्यात घालतात. निसर्गाला गृहीत धरत बेताल वर्तन करतात. अनेक ठिकाणी मद्य पार्ट्या चालतात. त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरतात. उन्मादामुळे अनेकदा अपघात घडतात. त्यात अनेक दुर्दैवी पर्यटकांचा जीव जाण्याच्या घटना अधूनमधून घडतात. असे का घडते? नियम धाब्यावर बसवण्याची वृत्ती याचे एक कारण आहे. वास्तविक अनेक पर्यटनस्थळी धोक्याचे फलक लावलेले असतात. स्थानिक लोक पर्यटकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. पण नियम न पाळण्यासाठीच असतात, असा भ्रम खोलवर रुजत आहे. परिणामी स्थानिकांच्या सूचना आणि शासकीय फलक याकडे बहुसंख्य पर्यटक सर्रास दुर्लक्ष करतात. इतरांचा, त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालतात. कोणत्याही प्रकारचे पर्यटन त्याला अपवाद नाही. त्यामुळेच शासन बंदीचा बडगा उगारते.
पर्यटक अशी बंदीदेखील निकालात काढतात हा भाग वेगळा. त्यामुळे शासनही बंदीच्या नियमांकडे बोट दाखवायला मोकळे होते. तसेही फक्त बंदी घालणे ही शासनाची सोयीस्कर पळवाट आहे. पर्यटन क्षेत्र रोजगार निर्माण करते. महसूल मिळवून देते. सुरक्षित पर्यटन हा पर्यटकांचा हक्क आहे आणि तसे ते बनवणे ही शासनाची जबाबदारी आहे. बंदी घालून जबाबदारी झटकली जाऊ शकत नाही. याशिवाय ज्याचा त्याचा जीव सुरक्षितता ही ज्याची त्याची जबाबदारी नाही का? सरकार बंदी घालेल. नियम बनवेल. तसे फलक लावेल. क्वचित बंदोबस्तही लावला जाईल. पण पर्यटकांची साथ नसेल तर ते फक्त उपचार ठरण्याचा धोका असतो. तेव्हा पर्यटकांनादेखील त्यांची जबाबदारी ओळखावी लागेल. मार्गदर्शक सूचना, नियम पालन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. क्षणिक मोह जीवावर बेतू शकतो याचे भान ठेवावे लागेल. मनाला आवर घालावा लागेल. तात्पर्य, कोणतेही अपघात न होता पर्यटन आनंदात पार पडणे ही सामूहिक जबाबदारी आहे.





