गणेशोत्सवात लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विविध गणेश मंडळांनी सामाजिक मुद्यांवर देखावे सादर केले आहेत. ते बघण्यासाठी लोक आता रात्रीचाही दिवस करतील. आगामी तीन दिवस जणू रस्त्यांना पाय फुटतील. परिसर रात्री उशिरापर्यंत जागेच राहातील. उत्सव शेवटच्या टप्प्यात आहे. गणेशभक्तांना आता विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत. कोणत्याही सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने डॉल्बी साउंड आणि लेझर लाईटचा वापर चर्चेत असतो. संभाव्य समस्यांचा त्यात समावेश असतो.
याही वर्षी राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर वापराला स्थानिक प्रशासनाने बंदी घातल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध होत आहे. बंदीला कायद्याचा आधार असला तरी त्याला व्यवसायाची किनार असल्याने बंदीविषयी नाराजी व्यक्त होताना आढळते. हा मुद्दा अनेकदा न्यायालयात देखील पोहोचला आहे. सामाजिक मुद्यांच्या बाबतीत नेहमी असेच घडते. वादविवाद आणि प्रतिक्रियांच्या गदारोळात मूळ मुद्याला बगल दिली जाते. वास्तविक, कोणतीही गोष्ट ‘अती केली की तिची माती होते’ हे माणसांना नव्याने सांगायला नको. त्या आशयाची म्हण लहानपणापासून माणसे शिकतात पण ती वापरात आणण्यास मात्र कसे विसरतात? डॉल्बी आणि लेझरचा वापर अती प्रमाणात वाढला आहे हे कोण नाकारू शकेल? छोट्यामोठ्या मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळे यातही त्यांचा वापर होताना आढळतो. मिळून सारा गोंगाट ऐकणार्यांना मात्र नकोसा होतो.
ध्वनी प्रदूषण ही जागतिक पातळीवरील गंभीर समस्या आहे. तिचे सृष्टी आणि मानवी आयुष्यावरील गंभीर परिणाम संशोधक समाजासमोर मांडतात. सामान्य माणसांना कदाचित तिचे गांभीर्य तितयाच तीव्रतेने लक्षात येऊ शकेल असे नाही. पण ज्याच्या त्याच्या कानांची काळजी ज्याची त्यानेच घ्यायला हवी. कारण विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी ऐकण्याची क्षमता असलेला दुसरा कान तयार करण्यात संशोधकांना अद्यापपर्यंत यश आल्याचे ऐकिवात नाही. ऐकण्याची क्षमता मोजण्याचे डेसिबल हे प्रमाण आहे. विशिष्ट डेसिबलनंतरचा आवाज सातत्याने कानावर पडला तर माणसांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. अनेकांच्या बाबतीत ती क्षमता कायमची गमावण्याचा धोका नाकारला जाऊ शकत नाही. डॉल्बीचा आवाज त्या क्षमतेपलीकडचाच असतो.
स्वतःचे कान पणाला लावण्यात कोणते शहाणपण दिसते? जे आरोग्याच्या हिताचे नाही त्याचा वापर माणसेच थांबवू शकतात. जसा सोलापूरकर थांबवू शकले. लोक स्वयंस्फूर्त एकत्र आले. त्यांनी सजग सोलापूरकर समिती स्थापन केली. ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनाही त्यात सहभागी झाल्या. त्यांंच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध मार्ग अवलंबले. जसे की, मानवी साखळी, मिस कॉल इत्यादी. त्याला यश आले आणि सोलापूरमधील गणेश आगमनाच्या मिरवणुका पारंपरिक खेळ, वाद्ये आणि अभंगांनी गाजल्या. त्याचीच री विसर्जन मिरवणुकीत ओढली जाईल यात शंका नाही. ‘अती तेथे माती’ची अनेक उदाहरणे अवतीभवती आढळतात. एकवेळ वापरून फेकून दिल्या जाणार्या प्लास्टिकचा वापर बेजबाबदार पद्धतीने इतका वाढला की त्याच्या वापरावर देखील बंदीचे पाऊल सरकारला उचलावे लागले. नद्यांमध्ये सातत्याने कचरा टाकला जातो. त्यामुळे अनेक नद्या प्रदूषित झाल्या आहेत. मृत होण्याचा धोका शास्त्रज्ञ व्यक्त करतात. माणसे नियमांना हरताळ फासतात. कायदे धाब्यावर बसवतात.
हे तरी वेगळे काय असते? संवेदनशील माणसांनी याकडे कानाडोळा करावा अशी अपेक्षा कशी करता येईल? बंदी कोणालाच आवडत नाही. मग ती घालण्याची वेळ येऊ न देणे समाजाच्याच हातात आहे. युवांकडून जाणत्यांना अपेक्षा असतात. कारण अनेक युवा विचार करू शकतात. समस्यांची त्यांना जाणीव त्यांना तीव्रतेने असू शकते. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या समस्यांवर मात करण्याचा अनेकांचा प्रयत्न आढळतो. सामान्य माणसांचे जगणे सहज आणि सुसह्य व्हावे असे अनेक अॅप तयार केले जातात. केवळ डॉल्बी आणि लेझर किरणांचा वापरच नव्हे तर विविध प्रकारच्या सामाजिक समस्यांची तड लावण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या सर्वार्ंनी एकत्र येऊन प्रयत्न केले जाऊ शकतात. त्याची वाट सोलापूरकरांनी दाखवली आहे.





