Saturday, July 25, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ०६ मार्च २०२६ - हा खेळ ऊन-सावल्यांचा

संपादकीय : ०६ मार्च २०२६ – हा खेळ ऊन-सावल्यांचा

मागील काही वर्षांपासून राज्यासह देशात ऋतूंचे वेगळेच चक्र अनुभवास येत आहे. जगाच्या पाठीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन मुख्य ऋतू प्रामुख्याने भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळसारख्या आशियाई देशांमध्ये प्रकर्षाने जाणवतात. हे सर्व देश एकेकाळी भारताचे भूभाग होते. या प्रदेशांना मोसमी म्हणजेच मान्सून हवामानाचे प्रदेश म्हणून ओळखले जाते. भारतीय परंपरेत सूर्याच्या नक्षत्रांमधील भ्रमणावर आधारित सहा ऋतू मानले जातात, जे प्रत्येकी सुमारे दोन महिन्यांचे असतात. वसंत (चैत्र-वैशाख), ग्रीष्म (ज्येष्ठ-आषाढ), वर्षा (श्रावण-भाद्रपद), शरद (आश्विन-कार्तिक), हेमंत (मार्गशीर्ष-पौष) आणि शिशिर (माघ-फाल्गुन). हे ऋतू नक्षत्रांच्या चक्राशी जोडलेले असतात. त्यामुळे विशिष्ट नक्षत्रांवर पावसाचा अंदाज लावला जातो. या सहा ऋतूंचे सहा सोहळे एकेकाळी निसर्ग साजरा करत होता. परंतु या सोहळ्याला वाढते प्रदूषण व मानवाच्या आततायीपणाची नजर लागली. त्यामुळे हे ऋतुचक्र सध्या पूर्णपणे बिघडलेले दिसते. याचा अनुभव सरत्या वर्षात घेत आपण जवळपास सहा महिने पावसाळा अनुभवला.

- Advertisement -

मान्सूननंतर कोसळणार्‍या या पावसाने नदीनाल्यांमधील पाण्याची पातळी वाढवली असली तरी द्राक्ष, कांदा, सोयाबीनसारख्या पिकांच्या उत्पादनावर या अतिपावसाचा परिणाम जाणवला. पावसाचा हंगाम वाढल्याने यावेळी थंडी जास्त पडेल व उन्हाच्या झळा कमी जाणवतील, असा अंदाज वर्तवला जात असतानाच मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाने आपले प्रखर रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी राज्याच्या काही भागात तीव्र उन्हाळा तर काही भागात पावसाची अधूनमधून हजेरी सुरूच आहे. परंतु यावर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात गुलाबी थंडीचा अनुभव घेता आला नाही. राज्यातून थंडीने गाशा गुंडाळला असून राज्याचे तापमान मार्च महिन्याच्या सुरुवातीसच चाळिशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. पहिल्या आठवड्यातच तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तीन ते सहा अंशांनी वाढला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भातील अकोला येथे मंगळवारी (दि.३) ३९.३ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, हे देशातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. जळगाव येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजेच १५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेसोबतच दमट हवामान वाढले आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागने मार्च ते मे या तीन महिन्यांत देशातील अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा इशारा दिला आहे. याची सुरुवात फेब्रुवारीपासूनच झाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे तापमान यावर्षी सरासरी २८.७८ अंश सेल्यिअस नोंदवले गेले आहे. जे सरासरी १.०७ आहे. पुढील दोन दिवसात राज्यात पुन्हा उन्हाळ्याबरोबरच पावसाळा असा दोन ऋतूंचा अनुभव घेता येऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शयता वर्तवली आहे. तर मुंबईसह कोकण किनारपट्टीला यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथील पारा ३८ अंशांच्या पार जाण्याची शयता वर्तविली आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्यातच उष्णतेची लाट येण्याची शयता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या वातावरणाचा फटका निघालेल्या रब्बी पिकांना बसण्याची शयता आहे. जगावर आता युद्धाचे ढग दाटत असताना याचा परिणामदेखील जागतिक वातावरण व पर्यावरणावर होऊ शकतो. पण याला निसर्गाचा लहरीपणा म्हणता येणार नाही. याला माणसाचा निष्काळजीपणा म्हणावे लागेल. निसर्गाला आपण गृहीत धरतो आणि हवे तसे बदल घडवतो. त्यातून काही प्रदेशातील ऋतूंची वैशिष्ट्ये बदलत चालली आहेत. हवामानशास्त्र विभागाने दिलेले ठोकताळे अनेकदा चुकताना दिसत आहेत. यावर्षी थंडी न झोंबताच निघून गेली. आता उन्हाचा तडाखा जाणवून अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात की, उन्हाची काहिली कमी करणार्‍या पावसाचा शिडकावा होतो, हे येणार्‍या काही दिवसांत स्पष्ट होईलच. तरीही ‘आला उन्हाळा, तब्येत संभाळा’ या उक्तीला अनुसरून आपण सज्ज राहणे सध्या योग्य राहील.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! CJP चे जंतरमंतरवरील आंदोलन अखेर मागे; केंद्र सरकारकडून सर्व...

0
नवी दिल्ली | New Delhi केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेले 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) आंदोलन...