Sunday, June 14, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ८ जुलै २०२५ - डॉक्टर-रुग्ण संवाद हवाच!

संपादकीय : ८ जुलै २०२५ – डॉक्टर-रुग्ण संवाद हवाच!

यंदाचा ‘राष्ट्रीय डॉक्टर दिवस’ नुकताच साजरा केला गेला. त्यानिमित्त नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात डॉक्टर-रुग्ण परस्पर संवादाची गरज प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केली. गरज व्यक्त केली गेली, याचा अर्थ उभयतांतील संवाद खरेच कमी होत चालला आहे का? अर्थात तशी शंका यावी, अशा घटना समाजात अधून मधून घडतात. त्याला एखादे निमित्त पुरते. मग आरोप-प्रत्यारोप झडतात. काही प्रसंगात टोक गाठले जाते. रुग्णालयातील साहित्याची मोडतोड आणि डॉक्टरांना मारहाण झाल्याचे आढळते. घटना घडली की, स्वाभाविकपणे दोन्ही घटक त्यांची बाजू मांडतात. त्यामुळे कोलाहल आणखी वाढतो. असे प्रसंग परस्पर विश्वास आणि संवादाला नख लावतात.

माहितीचा स्फोट आणि नवनव्या व्याधींच्या काळात डॉक्टर-रुग्ण संवाद अधिक गरजेचा बनतो. या संवादावर समाज माध्यमांचा परिणाम होणे अपरिहार्य आहे. कोणत्याही व्याधीची माहिती समाज माध्यमांतून रुग्ण घेऊ शकतात. त्याची पडताळणी करण्याची आवश्यकता त्यांना भासण्याचा संभव नसतो. सर्वांच्या जाणिवा तेवढ्या सजग नसतात. अफवा त्यात भर घालतात. परिणामी रुग्णांच्या डॉक्टरांकडून अपेक्षा वाढू शकतात. तंत्रज्ञानाचा वापर हेच त्यांच्यापुढचे मोठे आव्हान ठरते. डॉक्टर वेळ देत नाहीत, सविस्तर माहिती सांगत नाहीत, उपचारांच्या पायर्‍या समजावून सांगत नाहीत, घाईत येतात आणि जातात, असे मुद्दे मांडले जातात. त्यावर डॉक्टरही त्यांची बाजू मांडतात.

- Advertisement -

तथापि दोन्ही घटकांतील परस्पर विश्वास हीच रुग्ण बरे होण्याची पहिली पायरी असते. दोन्ही घटक परस्परपूरक आहेत. आरोग्य व्यवस्थेचे महत्वाचे खांब आहेत. एकाशिवाय दुसर्‍याचे अस्तित्व अर्थहीन ठरते. म्हणूनच कदाचित राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण संस्थेला या मुद्यावर नवा अभ्यासक्रम सुरु करण्याची गरज भासली असावी. त्याची माहिती संस्थेच्या संचालकांनी नुकतीच प्रसार माध्यमांना दिली. डॉक्टर-रुग्ण वा त्यांचे नातेवाईक, त्यांच्यातील विसंवाद आरोग्य क्षेत्रात आणीबाणीची परिस्थिती निर्माण करण्याचा धोका नाकारता येईल का? संवादाला पूरक परिस्थिती निर्माण करण्याची व ती राखण्याची जबाबदारी संबंधित सर्वांची आहे.

डॉक्टर-रुग्ण आणि सरकार यांची त्यात महत्वाची भूमिका आहे. ती त्यांना पार पाडावी लागेल. रुग्ण डॉक्टरांना ‘जीवनदाता’, खरे तर देवच मानतात, पण त्या भावनेचा अतिरेक करणे योग्य नाही. उपचार आणि त्यासंदर्भात संभाव्य खर्च अनेकदा कळीचा मुद्दा ठरतो. म्हणून डॉक्टरांच्या बाजूने या बाबतीत पारदर्शकता असायला हवी. डॉक्टर आणि रुग्ण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याचा विसर न पडणे हेच सर्वांच्या हिताचे आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...