Saturday, September 12, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ८ सप्टेंबर २०२५ - विशेष दिवस निमित्तापुरते?

संपादकीय : ८ सप्टेंबर २०२५ – विशेष दिवस निमित्तापुरते?

नुकताच राष्ट्रीय शिक्षक दिन सर्वांनी उत्साहात साजरा केला. असे विशेष दिवस समाजमाध्यमांवर साजरे करण्याची नवपरंपरा अलीकडच्या काळात रुजली आहे. शिक्षक दिनाचे महत्व व व्यक्तिमत्व विकासातील शिक्षकांचे योगदान सांगणारा मजकूर भरभरून वाहात होता. अनेकांनी त्यांच्या आवडत्या शिक्षकांंची आठवण आणि विशेष प्रसंग लिहिले. त्यांच्या मजकुराला भावनिक अधिष्ठान होते. समाजमाध्यमांमुळे सगळे विशेष दिवस सामाजिक झाले आहेत. लोक जागरूक होत असल्याचे ते निदर्शक मानले जाते.

हा बदल स्वागतार्ह असला तरी शिक्षकांची, संतांची आणि समाजसुधारकांची व्यापक शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणायची आणि पुढच्या पिढीत रुजवण्याची गरजही ते अधोरेखित करतात. समाजमाध्यमांवरील मजकुराचा धांंडोळा घेतला तर समाजात सुजाणत्व व सामाजिक भान रुजले आहे असा ग्रह होऊ शकेल. पण वास्तव खरेच तसे आहे का? तसे सुजाणत्व व्यापक स्तरावर सामाजिक व्यवहारात आढळते का? याचे उत्तर काहीसे नकारात्मक असू शकेल.

- Advertisement -

सुजाण नागरिक आढळतात, नाही असे नाही. पण लोकसंख्येच्या तुलनेत त्यांचे प्रमाण उणेच असू शकेल यात कोणालाही शंका नसावी. ते वाढणे हाच खरा शिक्षकदिनाचा उद्देश असावा. त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. बहुसंख्य लोक कायदे धाब्यावर बसवतात. नियम मोडतात. किंबहुना, असे करणे याला दुर्दैवाने हीरोगिरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. असे करणार्‍यांना युवा पिढी त्यांंचा आदर्श मानते. सगळी बंधने कशी कोलून लावतो हे गौरवाने सांगितले जाते. याला ज्येष्ठ पिढी म्हणजे मुलांचे पालकही अपवाद नाहीत.

नियमपालनाची सुरुवात घरापासून होते. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने सोपवू नका असे कायदा सांगतो. मुलांच्या हाती वाहन सोपवताना वाहतुकीचे नियम किती पालक मुलांना समजावून सांगतात? मुलगा वाहन नियमानुसार चालवतो, की नाही यावर लक्ष ठेवतात? काही पालक तसे करतही असतील; पण पालकच नियम पाळत नसतील तर मुले त्यांचे ऐकतील का? हे एक उदाहरण झाले. राष्ट्रीय संपत्तीची हेळसांड केली जाते. सामाजिक दंगलींमध्ये राष्ट्रीय संपत्तीचाच बळी जातो. लोक बस जाळतात. सरकारी रुग्णालयांची तोडफोड करतात. त्यांच्याच सारख्या सामान्यांची वाहने जाळतात. रेल्वे स्थानकांवर गडबड-गोंधळ घालतात. अशा पायाभूत सुविधा नागरिकांनी भरलेल्या कररूपी पैशातूनच उभारल्या जातात याचा विसर पडतो. तसा तो कधी असतो हाही प्रश्नच आहे म्हणा.

अन्याय होत असताना बहुसंख्य लोक बघ्याची भूमिका घेतात. अपघात झाले तर गरजूंना मदतीऐवजी त्याचे चित्रीकरण करण्यातच मग्न होतात. मध्यस्थी केली तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा मदत केली तर पोलीस विभागाच्या चकरा मारायला लागण्याची भीती हे त्याचे एक कारण असू शकेल. ती अस्थानी मानली जाऊ शकत नाही हेही खरे. पण तरीही मदत करणे हा माणसांचा स्थायीभाव असायला हवा. अडचणींवर मात करून मदत करण्याची भावना असायला हवी. काही जण तसे करतात, त्यांचा आदर्श ठेवला जाऊ शकेल.

देशात सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरू असतात. मतदान हे लोकशाहीतील प्रथम कर्तव्य आहे. याची जाणीव किती जण ठेवताना आढळतात? मत विकले जातच नसेल का? तसे करणार्‍यांना सुजाण मानले जाऊ शकेल का? युवा पिढी तोच वारसा पुढे चालवतांना आढळते. विद्यार्थ्यांना शाळेत नागरिकशास्त्र शिकवले जाते. पण याच विषयाला अत्यंत नगण्य मानले जाते आणि तसे करणे ही गंभीर चूक आहे असे मानले जात नाही. तो विषय किरकोळ गुणांपुरता उरला आहे. कदाचित त्याचेच पडसाद समाजात या ना त्या रूपाने उमटतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही दृश्ये बघतानाही ते ठळकपणे नजरेत भरतात. देश महासत्ता बनण्यासाठी देशातील अंतर्गत स्थैर्य अत्यावश्यक आहे. सुजाणत्वहा त्याचा पाया आहे. त्यासाठी कायद्याचा आदर, नियमांचे पालन, गरजूंना मदत करणे, आदर राखणे अशा मूल्यांना चमकदार स्वरूप प्राप्त केले जायला हवे. तसे करणार्‍यांना प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि मान मिळायला हवा. तसे करणे ही समाजातील जाणत्यांची आणि विचारवंतांची जबाबदारी आहे आणि त्याला साथ देणे ही सामान्य नागरिकांची जबाबदारी आहे. याची आठवण असे विशेष दिवस करून देतात. तेव्हा एका दिवसापुरता ‘इव्हेन्ट’ न बनवणे हे मिळून सार्‍यांचे कर्तव्य आहे.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये शिक्षक संघटनांचा मोर्चा; प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करा;...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे (म्युनिसिपल) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील प्राध्यापक कै. सोपान खंडेराव बोरसे...