शरीररचनेत फुफ्फुसाला प्राणवायूचे केंद्र मानले जाते. रक्तातील विशेषतः कार्बनडायऑक्साईड काढून टाकून प्राणवायू पुरवण्याचे काम ते करतात. त्यांच्या कामात बिघाड झाला किंवा त्यांची अवस्था खराब झाली तर माणसाला सतत थकवा जाणवू लागतो. अनारोग्य वाढीचे ते एक कारण ठरते. त्याअर्थाने सार्वजनिक उद्यानांनाही शहरांचे किंवा परिसराचे फुफ्फुसच मानले पाहिजे. उद्यानांमधील झाडे तेच काम करतात. वातावरणात प्राणवायूची मात्रा वाढवतात.
हवेतील विषारी घटकांची मात्रा कमी करू शकतात. परिणामी प्रदूषणाची पातळी कमी होऊ शकते. हवेची गुणवत्ता सुधारते. कडक उन्हापासून माणसांचा बचाव करणारी सावली देतात. जैविविधता जतन करतात. अशा या परिसर प्राणवायूच्या केंद्रांची म्हणजेच सार्वजनिक उद्यानांची तातडीने स्वच्छता करण्याचे आदेश नाशिक महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त मनीषा खत्री यांनी नुकतेच दिले.
नाशिक शहराला एकेकाळी उद्यानांचे शहर मानले जायचे. त्यांचे वैभव नाशिककरांनी अनुभवले आहे. तथापि त्यातील बहुसंख्य उद्यानांची सद्यस्थिती भीषण आहे. अनेक मोठी उद्याने भकास झाली आहेत. त्यातील खेळण्या तुटल्या आहेत. झाडे शुष्क झाली आहेत. त्यांना पडीक अवस्था प्राप्त झाल्याने ती गावगुंडांचा अड्डा बनल्याचे आढळते. त्याला काही उद्याने अपवाद आहेत. तथापि त्यांची संख्या कदाचित हाताच्या बोटावर मोजण्याइतकी देखील भरणार नाही. राज्याच्या इतर शहरांमधील सार्वजनिक उद्यानांची अवस्था यापेक्षा फारशी वेगळी नसावी.
नागरिकांचे सार्वजनिक जीवन फुलवण्यात उद्याने महत्वाची भूमिका पार पडतात. माणसांना एकत्र आणतात. नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पूर्वी दर रविवारी पोलीस बॅण्डचे पथक दोन तास त्यांची कला सादर करायचे. समस्त नाशिककरांचे ते आकर्षण ठरले होते. उद्यानांमध्ये विविध सार्वजनिक कार्यक्रम होतात. छोट्या विद्यार्थ्यांच्या छोट्या शैक्षणिक सहली तिथे येऊ शकतात. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची आणि वृक्षवेलींची ओळख करून घेण्याची संधी सहली देतात.
शारीरिक कसरती आणि काही खेळ मुले खेळू शकतात. रंगीबेरंगी निसर्ग आणि आल्हाददायक वातावरण मनाला सुखावते. देश आणि परदेशातील अनेक भव्य उद्याने पर्यटनस्थळ बनली आहेत. महसूलप्राप्तीचा मार्ग ठरली आहेत. तोच प्रयोग सर्वत्र राबवला जाऊ शकेल. कोणत्याही मोफत गोष्टींचे आकर्षण हा मानवी स्वभाव मानला जातो. एक उद्यान माणसाला इतक्या गोष्टी मोफत पुरवू शकते. पण त्यांची योग्य व्यवस्था राखली गेली तर.
नाशिक शहरातील उद्यानांची अवस्था सुधारण्याचे आदेश निघाले आहेत. तसे झाले तर नाशिककर त्याचे निश्चित स्वागत करतील. कविवर्य ना.वा. टिळक त्यांच्या एका कवितेत उद्यानाला प्रभूचे रम्य स्थान अशी उपमा देतात. त्यांच्या कवितेतील फुल म्हणते, ‘तेधवा निवडिले प्रभूचे स्थान, रम्य उद्यान..मन माझे मोहून गेले’. स्वच्छ उद्यानांप्रती नाशिककरांची तीच भावना असेल.