पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिकचे रामकुंड (Ramkund) हे अस्थी विसर्जनासाठी देशभरातील हिंदू धर्मीयांचे परम पवित्र स्थान मानले जाते. या ठिकाणी अस्थी विसर्जित केल्याने मृतात्म्याला मोक्ष मिळतो, अशी अढळ धार्मिक श्रद्धा आहे. मात्र, २००३ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान रामकुंड परिसरात करण्यात आलेल्या अति-काँक्रिटीकरणामुळे या अस्थींचे नैसर्गिक विघटन होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेने नुकत्याच राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत विसर्जित न झालेल्या अस्थींचे ढीग आढळल्याने नाशिककरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
धार्मिक शास्त्रानुसार, रामकुंडातील पाणी आणि तेथील नैसर्गिक रचनेमुळे विसर्जित केलेल्या अस्थींचे ठराविक वेळात विघटन होणे अपेक्षित असते.रामकुंड येथे प्रत्यक्षात मोठ्या उपनद्यांचा स्पष्ट भौगोलिक संगम दिसत नसला, तरी श्रद्धेनुसार या ठिकाणी तीन पवित्र नद्यांचा (त्रिवेणी) संगम मानला जातो.या ग्रंथोक्त त्रिवेणी संगमामुळेच या स्थळाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नदीपात्रात (River) मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण करण्यात आले.यामुळे पाण्याचा नैसर्गिक स्रोत आणि जमिनीचा (मातीचा) संपर्क तुटला असून,विसर्जित केलेल्या अस्थी कुंडाच्या तळाशी तशाच पडून राहत आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री, आनंद स्वरूपांवर गुन्हा दाखल करा; नाशिकमध्ये शिवप्रेमी आक्रमक
महानगरपालिकेकडून (Mahapalika) रामकुंड परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असता, कुंडाच्या तळाशी न विरघळलेल्या अस्थींचा मोठा साठा आढळून आला.कुटुंबाकडून अत्यंत श्रद्धेने विसर्जित केलेल्या अस्थी नदीच्या प्रवाहात पुढे वाहत न जाता किंवा विरघळता एकाच ठिकाणी साचून राहत असल्याचे पाहून उपस्थित नागरिकांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला. भाविकांच्या धार्मिक भावनांशी हा एकप्रकारे खेळ असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.काँक्रिटीकरणामुळे अस्थी निसर्गदत्त पद्धतीने विघटित होत नाहीत, त्याऐवजी त्या नदीपात्रात कचऱ्याप्रमाणे साचून राहत आहेत. यामुळे नदीचे प्रदूषण वाढत असून धार्मिक विधींच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसत आहे. महानगरपालिकेने यावर तातडीने उपाययोजना करावी आणि रामकुंडाचे नैसर्गिक स्वरूप पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी भाविक, पुरोहित आणि पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.





